नाशिक – इंदिरानगर परिसरात परवाना मुदत बाह्य झालेल्या बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी बंदुक, चार जिवंत काडतूसे जप्त केली आहे. शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करताना इंदिरानगरमधील गामणे मैदानासमोर हा प्रकार घडला. संशयित विलास विजय (वय ४७, रा. शिवालिक स्काय अपार्टमेंट, गामणे मळा) याच्याकडे बारा बोअरची बंदुक असून या बंदुकीच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याच्या जल्लोषात त्यांनी बंदुकीतून एक गोळी हवेत झाडली. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याबाबत पोलिसांना माहिती कळताच त्यांनी तत्काळ कारवाई केली. बारा बोअर बंदुक, चार जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. पोलिस नाईक सागर परदेशी यांच्या तक्रारीन्वये, विलास विजय याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.