नाशिक : गोवा राज्यातील कलंगुट येथे दंगल घडवून एकावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या संशयित नाशिक पोलिसांनी जेरबंद केला. युनिट एकच्या पथकाने सारडा सर्कल भागात पाठलाग करुन त्यास बेड्या ठोकल्या.संशयित नॅार्थ गोवा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आला आहे.
सुनिल नारायण भूमकर (३६ रा. कलंगुट, राज्य गोवा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. गोवा येथील कलंगुट पोलिस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी दंगल उसळली होती. संशयिताने प्राणघातक हल्ला केल्याने ही घटना घडली होती. मात्र संशयित फरार झाला होता. गोवा पोलीस त्याच्या मागावर असताना तो नाशिक पोलिसांच्या हाती लागला. खबरीवरून तपास पथक नाशकात येत होते. त्यांना भूमकरचा शोध घेण्यासाठी युनिट एकने मदत करण्याचे निर्देश नाशिकच्या वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार गोवा येथील पोलिस निरीक्षक आनंद गावकर पथकासह शनिवारी सकाळी आले. त्यांनी भूमकर हा द्वारका येथे येणार असल्याचे विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानुसार युनिट एकचे ढमाळ यांच्यासह, सहायक निरीक्षक खैरनार, उपनिरीक्षक उगले, एएसआय बागुल तसेच गोवा पोलिसांचे पथक द्वारका परिसरातील लॉज व हॅाटेल तपासत होते.
त्याचवेळी सारडा सर्कलवरील हॉटेल एस. एम. इंम्पिरियल येथे भूमकर दिसून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्याचा पाठलाग केला. तसेच थोड्या झटापटीनंतर त्याला ताब्यात घेतले. त्याची नोंद व वैद्यकीय तपासणी करून ताबा गोवा पोलिसांकडे दिला.