नाशिक : बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओ येथील सुरक्षा रक्षक दांम्पत्यास मारहाण व कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करणा-या दरोडे खोरांची टोळी पकडण्यात शहर पोलीसांना यश आले आहे. या टोळीतील तीन जणांना ठाणे जिह्यातील धाकटे शहाड येथे पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांचा अल्पवयीन साथीदारही पोलीसांच्या हाती लागला आहे. संशयीतांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेला टेम्पो व मोबाईल असा सुमारे ९ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली असून उर्वरीत टोळीतील सदस्यांचा शोध सुरू आहे. अंकुश शांताराम पराडे (२०),राजू अजप्पा बेरे (२१ रा.दोघे रा.बंदरपाडा,शहाड), विकी राजा वाल्मिक (१८ मुळ रा.आंबिवली हल्ली शहाड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून त्यांचा अल्पवयीन साथीदारास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बेळगाव ढगा येथील गर्गे आर्ट स्टुडिओ या कारखान्यात शुक्रवारी (दि.१०) ही घटना घडली होती. याप्रकरणी सुरक्षारक्षक जयदेव किसन जाधव (रा.गर्गे स्टुडिओ) यांनी तक्रार दाखल केली होती. देवदेवतांसह थोर पुरूषांची वेगवेगळया धातू पासून मुर्ती व पुतळे बनविणा-या या कारखान्यात पहाटेच्या सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने प्रवेश केला. याबाबत चाहूल लागताच जाधव दांम्पत्याने कारखान्यात धाव घेतली असता ही घटना घडली होती. सशस्त्र टोळक्याने जाधव यांना लाथाबुक्यांनी व धारदार कोयत्याने बेदम मारहाण केली. तसेच पत्नीस कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत टोळक्याने कारखान्यातील संत तुकारामांचे सुमारे साडे आठशे किलो वजनाचे धातूचे दोन पुतळे व शिवाजी महाराज यांची ब्रांझ धातूपासून बनविलेली १०० किलो वजनाची तलवार आणि सुमारे ४५० किलो वजनाचा पुतळा असा सुमारे ८ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गंभीर दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. युनिट १ चे सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या महितीवरून संशयीत पोलीसांच्या हाती लागले. शहाड व अंबोली येथील गुन्हेगारांनी हा दरोडा घातल्याची माहिती मिळताच युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना झाले होते. पोलीसांनी अंकुश पराडे यास हुडकून काढल्याने राजू बेरे, विकी वाल्मिक आणि अल्पवयीन मुलगा पोलीसांच्या हातील लागले असून त्यांनी अन्य पाच साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. संशयीतांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेला एमएच ०३ डीव्ही ०१६१ टेम्पो आणि तीन मोबाईल असा सुमारे ९ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयीतांना मुद्देमालासह सातपूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून उर्वरीत दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. ही कारवाई निरीक्षक विजय ढमाळ याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी,दिनेश खैरणार उपनिरीक्षक विष्णू उगले,अंमलदार येवाजी महाले,नाझीम पठाण,प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,महेश साळुंके,रावजी मगर,दिलीप मोंढे,विशाल देवरे,फय्याज सय्यद,आसिफ तांबोळी,समाधान पवार व प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.