नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील दोन सामान्य विमा कंपन्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेत तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीशिवाय ११ सैनिकांच्या मृत्यूशी संबंधित विम्याच्या दाव्याचा त्वरित निपटारा केला आहे. तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ हवाई दलाच्या एमआय-१७ व्ही ५ या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. त्यामध्ये जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका, ब्रिगेडियर एल एस लिड्डर यांच्यासह दहा इतर सैनिकांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेतील मृत पावलेल्या लष्कराच्या अधिकार्यांशी संबंधित समूह वैयक्तिक दुर्घटना (जीपीए) या विम्याचा दावा मंजूर करून त्याची त्वरित भरपाई करण्यात आली आहे. लष्करातील सर्व अधिकारी आणि जवानांच्या पगाराच्या खात्यातून जीपीए विम्याचा हफ्ता कापला जातो. सूत्रांच्या माहितीनुसार, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या सार्वजनिक विमा कंपन्यांनी दिवंगत सर्व अधिकारी आणि जवानांच्या दावा मंजूर करून त्याचा त्वरित निपटारा केला आहे.
युनायटेड इंडिया इन्शुरन्सने जनरल रावत आणि सात इतर जवानांच्या वैयक्तिक अपघात विम्याच्या दाव्याचा निपटारा विक्रमी वेळेत म्हणजेच ३० मिनिटांतच करून दिला आहे. त्याचप्रमाणे न्यू इंडिया इन्शुरन्सने ब्रिगेडियर लिड्डर यांच्याशी संबंधित विम्याचा दावा एका तासाच्या आत मंजूर करून दिला आहे.
युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक सत्यजित त्रिपाठी पीटीआयशी बोलताना म्हणाले, की १० डिसेंबरला आम्हाला बँकेकडून सूचना मिळाली होती की खातेधारकांचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ही माहिती मिळताच आम्ही बँकेने पाठविलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या आधारावर त्वरित दाव्याचा निपटारा केला आहे.
इतर जवानांचा या बँकेत दावा
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या इतर आठ जवानांना एसबीआयच्या जीपीए पॉलिसीअंतर्गत कव्हर केले होते. पंजाब नॅशनल बँकेत खातेधारक असलेल्या इतर दोन सैनिकांच्या जीपीए पॉलिसीच्या दाव्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही त्रिपाठी यांनी सांगितले. लष्करी अधिकार्यांना ३० लाखांचा विमा दिला जातो. तर हवाई दलातील सैनिकांना ४० लाखांचा विमा मिळतो.