नाशिक : चहाचे पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविशंकर मार्ग भागात घडली. या घटनेत फायटरचा वापर करण्यात आल्याने ३४ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुदस्सर सय्यद आणि इरफान सय्यद असे मारहाण करणा-या संशयीतांची नावे असून याप्रकरणी मुशिर गुलाब शेख (रा.रजा कॉलनी, पखालरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेख रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास रविशंकर मार्गावरील जीपीएस रेस्टॉरंट येथे चहा घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. चहा घेत असतांना दोघे संशयीत तेथे आले. यावेळी मुदस्सर सय्यद याने शेख यांना तुझे पैसे देतो असे सांगितले. परंतू शेख यांनी त्यास पैसे देऊ नको असे सांगितल्याने संतप्त दोघांनी शेख यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत लोखंडी फायटरचा वापर करण्यात आल्याने शेख जखमी झाले असून,त्यांचा चष्म्याचेही नुकसान झाले आहे. संशयीतांनी आमचे ऐकले नाही तर मारून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
………
सिडकोत ६६ हजाराची घरफोडी
नाशिक : सिडकोतील उत्तमनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ६६ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन रामभाऊ पाटील (रा.शिवपूरी चौक,उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटुंबिय १६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील ६६ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.