नाशिक – वाद मिटविण्यासाठी बोलावून घेत चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. या घटनेत हातातील कड्याचा आणि विटांचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश आहिरे,सुशांतसिंग उर्फ सोन्या,सुमित शिंदे व दिनेश कापडे (रा.सर्व जिजामाता कॉलनी) अशी तरूणास मारहाण करणा-या टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी नयनकुमार विठ्ठल गवई (२४ रा.हाजी चिकन जवळ,कार्बननाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. गवई हा रविवारी (दि.५) दुपारच्या सुमारास आपल्या घरी असतांना संशयीतांनी मोबाईलवर संपर्क साधून नुकत्याच झालेल्या प्रकाराबद्दल बोलायचे आहे असे म्हणून जिजामाता कॉलनीतील तुळजा भवानी मंदिर परिसरात बोलावून घेतले. गवई मित्र रोशन मोरे यास सोबत घेवून गेला असता संशयीतांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत पकडून ठेवत टोळक्याने हातातील लोखंडी कड्याने व विटेच्या तुकड्याने गवई यास मारहाण केली. या घटनेत गवई जखमी झाला असून अधिक तपास पोलीस नाईक हिंडे करीत आहेत.