नाशिक – सातपूरला शिवाजीनगर भागात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे पावने तीन लाखांची घरफोडी झाली आहे. तर खुटवडनगर परिसरातील आयोध्या कॉलनीत मंगळवारी रात्रीतून चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी लॉक तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी ४ लाख ५१ हजार १५० रुपयांचा एेवज चोरुन नेला आहे.
सातपूरला घडलेल्या घरफोडीत शिवाजीनगरला जिजामाता कॉलनीत तुळजा भवानी मंदीरामागील गणेशकृपा रो हाउस परिसरात मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरफोडी करीत २ लाख ७१ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी झाल्यानंतर बुधवारी (ता.७) शालीनी सोपान बोराडे यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. बोराडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चोरट्यांनी मंगळवारी रात्रीतून त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून दरवाजा उघडून त्याद्वारे घरात प्रवेश करीत, घरातील हॉलमध्ये टीव्ही खालील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत, अडीच तोळ्याची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची सोन्याची चेन, २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, आर्धा ग्रॅमची सोन्याची नथ, १० ग्रॅम सोन्याचे कानातले, चांदीचा ब्रॅसलेट असा सुमारे पावने तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला.
तर खुटवडनगर परिसरातील आयोध्या कॉलनीत मंगळवारी (ता.६) रात्रीतून चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी लॉक तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी गजेंद्र सुदर्शन गिरी (वय ४०, सदाफुली रेसीडेन्सी, आयोध्या कॉलनी खुटवडनगर) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. गजेंद्र गिरी हे बाहेरगावी गेले असता, त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा व सेफ्टी दरवाजाच्या सेफ्टी
लॉक उघडून चोरट्यांनी रात्रीतून घरातील बेडरुममध्ये प्रवेश करीत, तेथील लोखंडी कपाटात तसेच देव्हाऱ्यातील २१ ग्रॅमची सोन्याची पोत व मंगळसूत्र, १ लाख ८० हजाराची रोख रक्कम, ६ तोळ्याच्या देवाचे चांदीचे टाक असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.