बलात्कार प्रकरणी पतीवर गुन्हा
नाशिक : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रसुत झाल्याने ही बाब पोलीसात पोहचली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बलात्कार, बालविवाह प्रतिबंध आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण नंदू जाधव (२० रा.अमृतानगर,पाथर्डी फाटा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत पतीचे नाव आहे. पीडिता व संशयीत पती पत्नी असून त्यांनी गेल्या वर्षी आदिवासी पध्दतीने विवाह केला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतांना संशयीताने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व तिच्याशी विवाह केला. याकाळात शरिरसंबध प्रस्तापित केल्याने सोळाव्या वर्षीच मुलगी गर्भवती राहून तिने गोंडस मुलास जन्म दिला आहे. प्रसुतीसाठी पीडिता जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्याने हा प्रकार समोर आला असून अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
….
रिक्षाचालकाकडून एकास मारहाण
नाशिक : कट मारल्याचा जाब विचारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने एकास बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौकात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन भानजी राठोड (२७ रा. आरटीओ कार्यालयामागे पेठरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राठोड मंगळवारी (दि.६) गंगापूररोड भागात गेला होता. मॅरेथॉन चौकातून तो पायी जात असतांना एमएच १५ झेड ८५५३ या अॅटोरिक्षाने त्यास कट मारला. याबाबत त्याने चालकास जाब विचारला असता चालकासह रिक्षात मागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने राठोड यास बेदम मारहाण केली. या घटनेत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने चेतन राठोड जखमी झाला असून अधिक तपास हवालदार कोल्हे करीत आहेत.
…..