नाशिक – महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना वृध्देच्या बॅगेतील पर्स चोरट्यांनी केली लंपास
नाशिक : महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना भामट्यांनी गर्दीची संधी साधत वृध्देच्या बॅगेतील पर्स लंपास केल्याची घटना घडली. पर्समध्ये मोबाईल, सोन्याची अंगठी व रोकड असा सुमारे ४० हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता सुधाकर सोनार (६८ रा.वायलेनगर,खडकपाडा प.कल्याण) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सोनार या कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रविवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी नाशिक कसारा बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. गर्दीतून बसमध्ये चढत असतांना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या बॅगेतील पर्स लांबविली. या पर्समध्ये सोन्याची अंगठी, मोबाईल व १५ हजाराची रोकड असा सुमारे ४० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.
घरात शिरून चोरट्यांनी मोबाईल,ब्ल्यू ट्यूथ व लॅपटॉप केले लंपास
नाशिक : सायखेडारोडवरील पारिजातनगर भागात घरात शिरून चोरट्यांनी मोबाईल,ब्ल्यू ट्यूथ व लॅपटॉप असा सुमारे ३० हजाराचा ऐवज लंपास केला. गेल्या मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या चोरीप्रकरणी प्रविण परमेश्वर नायर (रा.पंचामृत रो हाऊस,विठ्ठल मंगल कार्यालया समोर,जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायर कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करून टेबलावर ठेवलेला लॅपटॉप,मोबाईल व ब्ल्यू ट्यूथ असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.
दोन अॅपल कंपनीचे मोबाईल बसप्रवासात चोरीला
नाशिक : दोन अॅपल कंपनीचे मोबाईल बसप्रवासात भामट्यांनी बॅगेतून लंपास केले. बॅग कापून त्यातील पर्स चोरट्यांनी चोरली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन थानचंद विग (रा.श्रीरामनगर,महालक्ष्मी टॉकिजजवळ,दिंडोरीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विग रविवारी (दि.२२) वणी ता. दिंडोरी येथून नाशिक बसमध्ये प्रवास करीत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग कापून पर्स हातोहात लांबविली. या पर्स मध्ये सुमारे ५० हजार रूपये किमतीचे अॅपल कंपनीचे दोन मोबाईल होते. ही विग घरी परतल्यानंतर निदर्शनास आली. अधिक तपास हवालदार वणवे करीत आहेत.