नाशिक – मोबाईल चोरट्यास पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचे चौदा मोबाईल जप्त केले आहे. गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील यांना एक संशयित मोबाईल चोर गुन्हेगार जेलरोड येथील पाण्याच्या टाकीजवळ मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संशयित पाण्याच्या टाकीजवळ येताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे दोन लाख १० हजार रुपयांचे १४ मोबाईल हस्तगत करुन त्याला अटक करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार अनिल बाळकृष्ण शिंदे, मनोहर शिंदे, विष्णू गोसावी, अवि देवरे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे आदी सहभागी झाले होते.
आचारी काम करणाऱ्या मांगीलाल धर्मा महाराज या युवकाचा मोबाईल चोरून नेल्यामुळे त्याने अज्ञात व्यक्ती विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली व हा चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलीस आयुक्त नाईकनवरे,पोलीस उपायुक्त विजय खरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश न्ह्यायदे, पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला होता.