चिमुरडीस पळवून नेण्याचा प्रयत्न शेजारच्यांच्या सतर्कतेमुळे फसला
नाशिक : शरणपूररोड भागात घरात झोपलेल्या चार वर्षीय चिमुरडीस एकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण शेजा-यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. शेजारच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी आरडाओरडा करताच हे भामटे मुलीस टाकून पळून गेले. या घटनेची तक्रार बेतले नगर भागात राहणा-या वृध्देने पोलिस स्थानकात दिली आहे. या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी घरातील किचनमध्ये वृध्दा काम करीत असतांना ही घटना घडली. वृध्देची चार वर्षीय नात युविका घरातील हॉल मध्ये झोपलेली होती. यावेळी दरवाजा उघडा असल्याची संधी साधून एका अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून मुलीस उचलून घेत पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मुलीस खांद्यावर घेवून सदर इसम घराबाहेर पडताच त्यास शेजारी राहणा-या महिलेने विचारपूस केल्याने ही बाब उघडकीस आली. विचारपूस करीत असतांना सदर इसमाने दुर्लक्ष केल्याने महिलेने आरडाओरड केली असता संशयिताने मुलीस खाली सोडून पोबारा केला. याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक भटू पाटील करीत आहेत.
गळफास लावून आत्महत्या
नाशिक : गळफास लावून ३४ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना संजय गांधीनगर भागात घडली. रविंद्र कृष्णा सोनवणे (३४ रा.सहा चाळ,संजय गांधीनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे यांच्या या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सोनवणे यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास कॅन्टोमेंट रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.