नाशिक : विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती व सासू विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहिरात व्यवसायाचे कार्यालय टाकण्यासाठी माहेरून वीस लाख रूपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी ज्ञानेश्वर शेना धनगर (रा.ओमकार हाईटस,गोकूळनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. धनंजय संतोष धनगर (३१) व संगिता संतोष धनगर (५० रा.वडती ता.चोपडा हल्ली जळगाव) असे विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त करणा-या संशयित पती व सासूचे नाव आहे.
मृत मुलीचे वडील ज्ञानेश्वर धनगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी श्रध्दा धनंजय धनगर ही गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथे माहेरी आली होती. जाहिरात व्यावसायीक पतीचे जळगाव शहरात भाडेतत्वावरील ऑफिस असल्याने माहेरून वीस लाख रूपये आणावेत यासाठी तिचा सासरच्या मंडळी कडून छळ सुरू होता. स्व:ताचे नवीन कार्यालय घेण्यासाठी तिचा छळ केला जात होता. पैसे घेण्यासाठी ती माहेरी आलेली होती. बुधवारी रात्री श्रध्दा पतीसमवेत व्हॉटसअपवर चॅटींग करीत असतांना संशयिताने संभाषणाची हास्य इमोजी पाठविल्याने तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. चॅटींगमध्ये आत्महत्येची धमकी देवूनही पतीने हास्य इमोजी पाठविल्याने तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक चकोर करीत आहेत.