इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – देशात धार्मिक स्थळांवर ध्वनिक्षेपक लावण्यावरून राजकारण सुरू असताना ध्वनिक्षेपक लावण्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात मंदिरात आरती करण्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर केल्यावरून एका व्यक्तीची कथितरित्या हत्या करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती बुधवारी एका हिंदू मंदिरात आरती करत असताना त्याने ध्वनिक्षेपकाचा वापर केला. त्यामुळे त्याच्याच समाजाच्या नागरिकांनी मारहाण करून त्याचा खून केला आहे. गुजरातमध्ये मंदिरात ध्वनिक्षेपक वापरल्यावरून हिंसाचार झाल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज येथील पोलिसांच्या माहितीनुसार, जसवंतजी ठाकोर (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जसवंतजी ठाकोर हे रोजंदारीवर काम करत होते. पोलिसांनी जसवंत यांचे मोठे भाऊ अजित यांचा जबाब नोंदवला आहे. सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जावनजी ठाकोर आणि विणूजी ठाकोर यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जोताना तालुक्यातील लक्ष्मीपारा गावातील अजित यांच्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजता झाली आहे.
अजित यांच्या जबाबानुसार, जशवंत आणि ते घराजवळील मेलदी माता मंदिरात आरती करत होते. ते ध्वनिक्षेपक लावून आरती करत होते. त्या वेळी सदाजी त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, की मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक का वाजवत आहात. सदाजी त्यांना शिवीगाळ करू लागले.
दोन्ही भावांनी विरोध करताच सदाजी यांनी आपल्या साथीदारांना बोलावले. गुन्हा दाखल करण्यात आलेले पाचही आरोपी घटनास्थळी पोहोचले. पाचही आरोपींनी लाठ्या-काठ्यांनी दोन्ही भावांवर हल्ला केला. त्यांच्या दहा वर्षीय पुतण्याने आपल्या आईला फोन केला, त्यांनी पोलिसांना पाचारण केले.
ग्रामस्थांनी दोन्ही भावांना मेहसाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना अहमदाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना जसवंत यांचा मृत्यू झाला. तर अजित यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. यापूर्वी २ मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला तालुक्यातील ३० वर्षीय भरत राठोड यालासुद्धा ध्वनिक्षेपक मोठ्याने वाजल्यावरून मारहाण करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी हिंदू समाजाच्या वेगवेगळ्या जातीतील होते.
https://twitter.com/ANI/status/1522449024955318272?s=20&t=ihkKpY60ioousif8Hh18SQ