नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून मैत्रीणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका विद्यार्थी नेत्याचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आरोपीच्या समर्थकांनी पोस्टर, होर्डिंग लावून आणि सोशल मीडियावर पोस्ट करून ‘भय्या इज बॅक’, ‘बॅक टू भय्या’ आणि ‘वेलकम टू रोल जानेमन’ सारख्या ओळी टाकून आरोपीचे वाजत-गाजत स्वागत केले होते. एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या स्वागताची ही शैली पीडितेसाठी धोकादायक ठरू शकते, हे हेरून सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला दणका दिला आहे.
सोशल मीडियावर प्रभावशाली व्यक्तींसोबत आरोपीचे फोटो आणि त्याच्या खाली लिहिण्यात आलेल्या ओळी हे आरोपी आणि त्याचे कुटुंबीय समाजातील प्रभावशाली आणि शक्तिशाली असण्याला दुजोरा देतात. तसेच तक्रारदारावर त्याचा गंभीर परिणाम होण्यास जबाबदार ठरू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. आरोपी विद्यार्थी नेता असून, त्याचा संबंधित पोस्टरांशी आणि होर्डिंगशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
खंडपीठाने प्रतिकूल परिस्थितीचे निरीक्षण लक्षात घेऊन उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला आहे. आरोपीने एका आठवड्याच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. २१ जून २०२१ रोजी पीडितेने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला आहे. जुलै २०१९ मध्ये अधिकृतरित्या कुंकू लावून लग्न केल्याचे सांगत विश्वासात घेतले होते, असा आरोप पीडितेने केला आहे.
जुलै २०२० मध्ये पीडिता गर्भवती झाली होती. आरोपी आणि त्याच्या बहिणीनीने पीडितेला गर्भपातासाठी काही गोळ्या खाऊ घातल्या होत्या. त्यानंतर तो तिला टाळू लागला आणि नंतर लग्नाला नकार देऊ लागला. आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास उशीर केल्याचे सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर करून दिलासा दिला होता.
आरोपीच्या निर्लज्ज आचरणाने पीडितेच्या मनात वास्तविक भय निर्माण केले आहे. आरोपीची जर जामिनावर सुटका झाली, तर तो या प्रकरणाची सुनावणी स्वतंत्र आणि निष्पक्ष होऊ देणार नाही. तो पुरावे आणि साक्षीदारांना प्रभावित करू शकतो, असे खंडपीठाने म्हटले आहे.