इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांवर कारवाई करण्यासंदर्भात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.अंमली पदार्थ आणि मादक पदार्थ न्यायालय,(NDPS) रायपूरने देशातील सर्वात मोठ्या गांजा जप्तीच्या प्रकरणात सहभागी असलेल्या 5 आरोपींना दोषी ठरवले आहे आणि त्यांना 20 वर्षे कारावास आणि प्रत्येकी 2 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
विशिष्ट माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी 24 जून 2018 रोजी संतोषी नगर चौक, रायपूर येथे गांजाने भरलेले वाहन अडवले होते. ट्रक ओल्या नारळांनी भरलेला होता. या ट्रकमध्ये तीन जण प्रवास करत होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी अधिकाऱ्यांसमोर नारळाच्या खाली गांजा ठेवल्याची कबुली दिली.
नारळ उतरवल्यानंतर, तपकिरी चिकट टेपने गुंडाळलेली एकूण 1,020 आयताकृती पॅकेट सापडली ज्यामध्ये गांजा होता. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 6,545 किलो होते आणि त्याची किंमत 9,81,75,000/- रुपये एवढी होती.यावेळी ट्रकमधील तिघांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीच्या आधारे, जप्त केलेल्या गांजाचा पुरवठा करणाऱ्या इतर दोन व्यक्तींनाही अटक करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपपत्र डिसेंबर 2018 मध्ये एन डी पी एस न्यायालय, रायपूर येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी जून 2019 मध्ये सुरू झाली आणि 15 मार्च 2023 रोजी निकाल देण्यात आला.
गांजाची ही जप्ती देशातील सर्वात मोठी जप्ती होती. डी आर आय च्या तत्पर आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे गांजाच्या अशा बेकायदेशीर व्यापार केवळ उघडच नाही झाला, तर दोषीवर कारवाई करण्यातही मदत झाली आहे, ज्यामुळे देशाच्या तरुणांचे उज्वल भविष्य नष्ट करणाऱ्या आणि त्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्याची आणि त्याच्याशी लढण्याची डी आर आयची क्षमता बळकट झाली आहे.
Crime Ganja Illegal Trade Court Punishment