मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाहूर परिसरात अतिशय धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका नऊ वर्षांच्या चिमुकलीवर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले जात असल्याचे समोर आले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, अटक केलेले हे दोन्ही आजोबा आहेत. आणि या सर्वप्रकाराकडे मुलीच्या आईने दुर्लक्ष केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आणि आजी कामावर जात असल्याने मुलीला सांभाळण्यासाठी ज्यांना ठेवले होते त्यांनीच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भांडुपमधील नाहूर परिसरात घडली आहे. या परिसरात ९ वर्षांची मुलगी तिच्या आई आणि आजीसोबत रहायची. आई आणि आजी दोघीही कामानिमित्त दररोज बाहेर जात असतल्याने मुलीला दिवा येथे राहणारा आरोपी आप्पा उर्फ अशोक एकनाथ वारुंगसे (६२), भांडुपमधील दिनेश रामजी ठक्कर (६५) यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिले जायचे. पण या दोघांचीही संबंधित मुलीवर वाईट नजर पडली.
चिमुकलीच्या एकटेपणाचा फायदा घेत दोघांनीही तिच्यावर अत्याचार सुरु केले. एका समाजसेवी संस्थेला शंका येताच त्यांनी पीडितेकडे विचारपूस केली. त्यांनी मुलीचा ताबा घेत तिला मानखुर्दच्या बालगृहात ठेवले. तेथील अधिकाऱ्यांनी विश्वासात घेत चौकशी करताच तिच्यावर सुरु असलेल्या क्रुरतेला वाचा फुटली. “ज्यांना आजोबा म्हणायचे त्यांनीच अत्याचार केले. आईलाही सांगितलं पण तिने दुर्लक्ष केलं.” अशा शब्दांमध्ये पीडित मुलीने भावना व्यक्त केल्या आहेत.
या घटनेमुळे तिला मानसिक धक्का बसला असून पोलिसांकडून तिचे समुपदेशन करण्यात येत आहे. २०२०पासून २० जूनपर्यंत तिच्यावर अत्याचार सुरु होते. आईला याबद्दल सांगूनही आईने दुर्लक्ष केल्याने पीडितेची मोठीस कुचंबना झाली. ही बाब समोर येताच पोलिसांनी पोक्सो, लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली. या प्रकरणातील तिसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप पोलिस घेत आहेत.
Crime 9 Year Old Girl Sexual Assault 2 Arrested
Mumbai Bhandup Nahur Grand Fathers Mother Police