इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या मोठा कठीण काळ आला आहे, असे म्हटले जाते. विशेषतः करोना महामारी नंतर जगभरात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. श्रीमंत व्यक्ती अधिक धनवान बनत असून गरीब जनतेची संख्या वाढतच आहे, असेही म्हटले जाते. तसेच जगभरात महागाईचा भडका वाढला आहे. त्यातच आता जागतिक अहवालाने सगळ्यांची झोपच उडविली आहे.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी जगभरातील श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्ती येथे दाखल झाले आहेत. या प्रसंगी ऑक्सफॅम इंटरनॅशनलने सोमवारी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतर जगात दर 30 तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला. उलट या वर्षी आता दर 33 तासांनी 10 लाख नागरिक गरिबीच्या खाईत जाणार आहेत.
दावोसमध्ये ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या या अहवालात ऑक्सफॅमने हा मोठा दावा केला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मागील दशकांच्या तुलनेत झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. अन्न आणि ऊर्जा क्षेत्रातील अब्जाधीश दर दोन दिवसांनी त्यांची संपत्ती $1 अब्जने वाढवत आहेत.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ही सार्वजनिक-खासगी भागीदारीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दावोसमध्ये दोन वर्षांनंतर त्याची बैठक होत आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे ही बैठक होऊ शकली नाही. ऑक्सफॅम आंतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक गॅब्रिएला बुचर यांनी अहवालात म्हटले आहे की, “जगातील अब्जाधीश त्यांच्या नशिबात झालेल्या अविश्वसनीय परिवर्तनाचा उत्सव साजरा करण्यासाठी दावोस येथे येत आहेत.
महामारी आणि आता अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. तर दुसरीकडे, नागरिकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अनेक दशकांची प्रगती व्यर्थ ठरली आहे आणि लाखो जनता केवळ जगण्यासाठी अभूतपूर्व महागाईचा सामना करत आहेत.
या अहवालात म्हटले आहे की, कोविड-19 च्या पहिल्या दोन वर्षांत अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या 23 वर्षांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती आता जागतिक जीडीपीच्या 13.9 टक्के इतकी आहे. 2000 मध्ये ते 4.4 टक्के होते, जे तीन पटीने वाढले आहे.
तसेच बुचर म्हणाले की, अब्जाधीश हुशार आहेत किंवा कठोर परिश्रम करतात म्हणून नाही तर अतिश्रीमंत आता अनेक दशकांच्या हेराफेरीचा फायदा घेत आहेत. खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे त्यांनी जागतिक संपत्तीचा मोठा हिस्सा बळकावला आहे आणि टॅक्स नसलेल्या देशांमध्ये आपली संपत्ती लपवून ठेवली आहे.