मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलांवरील वाढते अत्याचार महिला सुरक्षेसमोरील अतिशय मोठे आव्हान आहे. अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र देशभरात आहे. अशाच घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. परवानगीशिवाय कोणत्याही महिलेच्या शरीराला स्पर्श करण्याचा पुरुषाला अधिकार नाही, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने आरोपी चुलत भावाला फटकारले आहे. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १३ वर्षांपूर्वी आपल्या तरुण चुलत बहिणीचा हात पकडून लग्नाची मागणी घातल्याप्रकरणी एका ४३ वर्षीय पुरुषाला एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
पीडित मुलीने इयत्ता नववीत शिकत असताना २ फेब्रुवारी २००९ रोजी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती शाळेतून घरी जात असताना तिच्या चुलत भावाने तिचा हात धरला आणि लग्नाची मागणी घातली. त्याने तिला आपल्या घरी बोलावून फसवल्याचा दावाही तिने केला होता. यावेळी तिच्या बचावासाठी घटनास्थळी आलेल्या तिच्या दुसऱ्या बहिणीलाही त्या भावाने चापट मारली. लग्नाची मागणी घालताना आरोपीने त्याच्या चुलत बहिणीचा हात धरला होता.
यामुळे त्याने स्त्री सन्मानाला धक्का दिला, असा आरोप करीत आरोपीच्या चुलत बहिणीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तिच्या याचिकेचा स्विकार करीत आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला शिक्षा ठोठावली आहे. नात्याचा गैरफायदा घेऊन विनयभंग करणाऱ्या आरोपींना कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयामुळे चांगलाच दणका बसला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा निकाल महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर्स अॅक्टनुसार आरोपीच्या वकिलाने त्याच्या दयेची विनंती केली आणि त्याला चांगल्या वर्तनाच्या करारावर सोडण्यास सांगितले. मात्र दंडाधिकारी डांगे यांच्या आदेशानुसार, कलम ३५४ नुसार (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर करणे) महिलेला लक्ष्य करण्यात आले. याव्यतिरिक्त, पीडितेने त्याच्याविरुद्ध अतिरिक्त तक्रारी केल्या आहेत याचाही विचार केला.
गुन्ह्याचे स्वरूप, पीडितेचे वय आणि इतर तक्रारींचे चालू स्वरूप पाहता, हे प्रकरण प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स कायद्याच्या फायद्यांसाठी पात्र ठरत नाही, असा निष्कर्ष दंडाधिकाऱ्यांनी काढला. या व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यातून कलम ३२३मधून मुक्त करण्यात आले. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणातील ४३ वर्षीय आरोपी पुरुषाला एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरडी डांगे यांनी सांगितले की, २००९मध्ये पीडितेचे वय १६ वर्षांपेक्षा कमी होते. आरोपीच्या वागणुकीमुळे तिला अपमानित आणि लज्जा वाटली.
Court order cousin sister molestation