नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरणे जाहीर केली आहेत. याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अशी माहिती महाऊर्जा, विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी शासनामार्फत गेल्या काही वर्षापासून स्वयं अर्थसहाय्यित तसेच केंद्र शासनाच्या अर्थसहाय्यातून विविध योजना राबवत आहे. राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे मंजूर केलेल्या कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० नुसार सर्व शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा सूनिश्चित वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे महाकृषि ऊर्जा अभियान जाहीर केले आहे. राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण-२०२० अंतर्गत प्रतिवर्षी १ लाख याप्रमाणे पुढील ५ वर्षात ५ लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यास मान्यता दिली आहे.
ही योजना राज्यातील ३४ ग्रामीण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. राज्यात हे अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण- महाऊर्जा) मार्फत राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाव्दारे सबसिडी पोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे. याकरीता राज्यातील शेतकऱ्यांना पारंपारिक पध्दतीने वीज जोडणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येतील. या योजनेसाठी केंद्र शासनाचे ३० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा १० टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा ५ टक्के असणार असून उर्वरित ६० टक्के/ ६५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा असेल.
पीएम – कुसुम योजना राबविण्यासाठी महाऊर्जा मार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर भेट द्यावी. सौर कृषीपंपासाठी पुरवठादाराकडून ५ वर्षांसाठीचा सर्वकष देखभाल व दुरुस्ती करार करण्यात असून तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधित लाभार्थ्यास हस्तांतरीत करण्यात येईल. त्यानंतर त्याची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील याची कृपया नोंद घ्यावी, असेही विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
Farmers Solar pump agriculture apply now Government Scheme Mahaurja Kusum Yojana