नवी दिल्ली – स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न देशभरातील हजारो नव्हे लाखो तरुण पाहतात. परंतु त्यापैकी अनेकांचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही, तरीही त्यासाठी ते सातत्याने अनेक वर्षे प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांना यश मिळत नाही, असे बघून अनेक जण निराश होतात. तर काही गैर मार्गाचा वापर करण्याच्या दबावाला बळी पडतात.
सध्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार होतात, असाच गैरप्रकार एका स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात घडला. त्यातील संशयित आरोपीला शिक्षा देखील झाली. परंतु या वेळी न्यायालयाने दिलेला निकालाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. जेईई मेन परीक्षेत फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी अजिंक्य नरहरी पाटील याला जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने अजब निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश हरीश कुमार यांनी अजिंक्य पाटील यांना ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना सांगितले की, आरोपीला जामीन मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांना गुगल मॅपवर त्याचे लोकेशन शेअर करावे लागेल.
संशयित आरोपी अजिंक्य पाटील हा अॅफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथे कर्मचारी आहेत. जेईई मेन परीक्षेत सॉल्व्हरद्वारे विद्यार्थ्यांना जागा मिळवून देण्याच्या कामात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. यासाठी तो या स्पर्धा परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जागा निश्चित करण्याचे आश्वासन देऊन पैसे घेत असे.
दि. २ सप्टेंबर रोजी सीबीआयने या रॅकेटचा पर्दाफाश केला आणि पाटील आणि इतर सात जणांना अटक केली. पाटील याचा दिल्ली-एनसीआरमधील परीक्षा केंद्रांच्या पर्यवेक्षकांशी संगनमत असल्याचा सीबीआयचा आरोप आहे.