मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली बार असोसिएशनतर्फे पटियाला हाउस कोर्ट परिसरात होळी मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अश्लील नृत्य झाल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत प्रधान जिल्हा न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘बुरा ना मानो होली है’ म्हणत रंगांचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. या सणानिमित्त विविध संस्था, संघटनांतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयातील बार असोसिएशनने होळी मिलनचा कार्यक्रम घेतला. या सांस्कृतिक उपक्रमादरम्यान आयटम डान्स सादर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने या प्रकरणी संबंधितांची कानउघाडणी केली.
‘न्यायालयाच्या परिसरात झालेला हा नाच योग्य नव्हता आणि त्या कार्यक्रमाचे समर्थन करता येणार नाही. यामुळे न्यायव्यवस्थेला गालबोट लागले आहे. अशा गोष्टींमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे,’ असे या प्रकरणी न्यायालय म्हणाले. बार अॅण्ड बेंचने दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने प्रधान जिल्हा न्यायाधीशांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून अहवाल मागवला आहे.
न्यायालय परिसरात झालेल्या या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली बार असोसिएशनला कुठल्याही कार्यक्रमासाठी न्यायालयाच्या जागेचा वापर करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Court Holi Celebration Item Dance High Court Order
Delhi Patiala House