नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागासवर्गीय समाजाचे (ओबीसी) नाहीत. त्यांनी खोटी जात लावली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, ओबीसी समाजाची वोट बँक गमावण्याची भीती भाजपला आहे. त्यामुळेच मोदी हे ओबीसी असल्याचे सांगत ओबीसी समाजाची मते मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आज नाशिकमध्ये झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बेधडकपणे त्यांची मते मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थांबविण्यात आली. ओबीसी समाजासाठी स्थापन केलेला बांठिया रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. राज्यात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. ईडी सरकारला तर देवाची पण भीती राहिली नाही. अनंत चतुर्दशीला घोषणा करतात पण अजून शेतकऱ्यांना कवडीचीही मदत मिळाली नाही, असा दावा त्यांनी केला.
पटोले पुढे म्हणाले की, राज्यात येत असलेले वेदांता सारखे उद्योग ईडी सरकारने गुजरातला पाठवले. महाराष्ट्राची लूट करून गुजरातला पाठवत आहेत. यातून महाराष्ट्राचे आतोनात नुकसान होत आहे. २०१४ ते २०१९ या काळात फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवले. आता त्यांच्याच काळात वेदांता सारखा मोठा प्रकल्पही गेला, असा टोला पटोले यांनी लगावला.
पटोले यांनी आरोप केला की, ईडी सरकार हे लोकशाही विरोधी आहे. हे सरकार फार काळ टिकणार नाही. जनतेला सर्व दिसते आहे. राज्याच्या विकास होतो आहे की अधोगती होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा आता भाजपला सलत आहे. त्यामुळेच विविध प्रकारचे आरोप होत आहेत. मात्र, गांधी यांना यात्रेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे आता देशाचे चित्र बदलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1571376232528482304?s=20&t=UrOHypLbToA5RifhY4k3cw
Congress President Nana Patole on PM Modi OBC
Nashik Press Conference