जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि शुभवार्ता आहे. जिल्ह्यातील महत्त्वाचे तीन सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या कारखान्यांना आर्थिक बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम नजिकच्या काळात दिसणार आहे.
एकेकाळी केळी उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कालांतराने ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रक्रमावर घेतले जात होते. साधारणत : १९७० पासून ते २००० पर्यंत सुमारे 30 वर्षाच्या कालखंडात जळगाव जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखान्यांनी उसाचे प्रचंड गाळप केले. तसेच राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये अग्रक्रम विविध नावलौकिक मिळविला होता. परंतु कालांतराने अनेक कारणांमुळे हे कारखाने कर्जबाजारी होऊन आजारी पडले, आणि बंद पडले. त्यानंतर सदर सहकारी साखर कारखाने सुरू करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, त्यातील काही कारखाने सुरूही झाले परंतु पुन्हा बंद पडले, हे कारखाने सुरू आणि बंद राहण्याचे चक्र अद्यापही सुरूच आहे.
जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेची १०६ वी सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्यासह संचालक मंडळ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेशी संबंधित विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. तसेच सहकारी साखर कारखाने सुरु करण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. २०१८मध्ये जळगाव जिल्ह्यात दोन खासगी कारखाने सुरू झाले आहेत. त्यात मुक्ताईनगर येथील मुक्ताई व बेलगंगा (ता. चाळीसगाव) येथील कारखाने सुरू झाले होते. अंबाजी कंपनीकडून सुरु झालेले हे कारखाने सर्वाधिक दीड ते दोन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल, असे सांगितले जात होते. परंतु कालांतराने हे दोन्ही कारखाने बंद पडले.
अनेक वर्षे बंदावस्थेतील बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात पुन्हा सुरू झाला तर चाळीसगाव तालुक्यातील उसाखालील क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. जळगाव जिल्ह्यात न्हावी (ता.यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना व चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी कारखाना अजूनही सुरू झालेला नाही. हे कारखाने देखील सुरू झाल्यास या भागातील ऊस उत्पादकांना फायदा होणार आहे , कारण त्यांना आपला ऊस मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यात किंवा मध्य प्रदेशातील कारखान्यात न्यावा लागतो.
२०१४ मध्ये जिल्हा बँकेने आपल्या ताब्यात असलेल्या रावेर तालुका सहकारी साखर कारखाना विक्रीस काढला होता . फक्त एकच निविदा प्राप्त झाली असताना त्या कंपनीलाच कारखाना विक्री करण्याचा निर्णय बहुमताने घेतला गेला होता. हा निर्णय संशयास्पद असल्याचे सांगत या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा माजी मंत्री तसेच बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांनी दिला होता. विशेष म्हणजे हाच साखर कारखाना लक्ष्मीपती बालाजी शुगर इंडस्ट्रिजला यापूर्वी भाडे तत्वावर देण्यात आला होता. या संबंधात बँक व लक्ष्मीपती कंपनीत वाद होऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते, तो वाद अद्याप चालूच आहे
जिल्ह्यातीलच मधुकर सहकारी साखर कारखान्यांकडे देखिल गत तीन वर्षांपासून सुमारे ६० कोटी रूपयांची थकबाकी येणे आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने यासंदर्भातही संबंधित कारखान्यांकडे वसुलीसाठी पत्रव्यवहार केले.तसेच कारखान्याला नोटीस देऊन साठ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र थकबाकी भरू न शकल्याने अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या वर्षी (एप्रिल २०२२ ) सिक्युटरायझेशन अॅक्टअंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला.
मे २०१९मध्ये फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांची शासन थकहमी देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस असल्याने शेतकरी व कामगारांच्या हितासाठी हा कारखाना सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू झाला खरा परंतु कालांतराने बंद पडला.
जिल्ह्यासह राज्यात अनेक भागात मागील पाच ते सहा वर्षांपासून असलेली दुष्काळी आणि अति पावसाची परिस्थिती, साखरेचे कमी झालेले दर, साखर कारखान्यांची हलाखीची आर्थिक स्थिती या पार्श्वभूमीवर कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, शेतमजूर व साखर कारखान्यांचे कर्मचारी यांच्या हितासाठी कारखाने सुस्थितीत सुरू ठेवता यावेत, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम देता यावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने सुरू व्हावेत, अशी जिल्हा बँकेची अपेक्षा आहे त्या संदर्भात हालचाली सुरू झाले आहेत.
गेल्या काळात जिल्हा बँक ही ड वर्गात केली होती. मात्र गेल्या दहा वर्षाच्या काळात बँकेच्या कमी झालेल्या ठेवी आता पुन्हा वाढल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्हा बँकेत ३२०० कोटी रुपयांच्या वर ठेवी आहेत. संचित तोटे तसेच एनपीए सुद्धा या वर्षी पाच टक्क्यांनी कमी झाला असून आता एनपीए १९ टक्क्यांपर्यंत राहिला आहे. जिल्हा बँकेचे एकंदरीत सद्यस्थिती चांगली असून सर्व सभासदांनी बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
सध्या जिल्ह्यातील तीन सहकारी साखर कारखाने सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. यात चोपडा साखर कारखाना, बेलगंगा साखर कारखाना, मधुकर सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. विक्रीस काढलेले हे साखर कारखाने भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. तर मधुकर सहकारी साखर कारखान्याबाबतही विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने तो भाडेकरारावर देण्याबाबतचा प्रस्ताव आला असून त्यावर सुद्धा लवकरच निर्णय होईल त्यामुळे जिल्ह्यात बंद असलेले सर्व सहकारी साखर कारखाने सुरू झाल्यास जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार कारखान्याचे कर्मचारी यांना निश्चितच त्याचा लाभ होईल असे सांगण्यात येते.
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने सुरू झाल्यास शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. मात्र हे कारखाने दीर्घकाळासाठी चालतील का? याविषयी ऊस उत्पादक व संबंधित कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने बंदावस्थेत आहेत. हे साखर कारखाने सुरु करण्याबाबत आता महत्त्वाचा निर्णय झालेला असून याबाबत जिल्हा बँकेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे आता अनेक दिवसांपासून बंद असलेले साखर कारखाने सुरु होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jalgaon District Sugercane Farmers Good News