हिंगोली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस नेत्या व विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला राजकीय नसल्याचे आरोपीच्या आईने म्हटले आहे. आपल्या मुलाला माफ करण्याची विनवणी करताना आरोपीच्या आईला अश्रू अनावर झाले. बुधवारी झालेल्या या घटनेवर बरीच राजकीय चर्चा रंगली. यात राजकीय अँगल शोधण्याचाही बराच प्रयत्न झाला.
हिंगोलीतील कळमनुरीच्या कसबे धवंडा गावाच्या दौऱ्यावर गेल्या असताना प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटायला लागल्या. विशेषतः हा हल्ला राजकीय उद्देशातून करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला. काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांकडून या घटनेचा निषेध होऊ लागला आणि विरोधी पक्षावरच शंकेचं बोट उचललं जाऊ लागलं. पण त्याचदरम्यान आरोपी महेंद्र डोंगरदिवेचे आई-वडील सातव यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
आपला मुलगा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, हे सांगताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले. त्याचवेळी त्यांनी मुलाला माफ करण्याची विनवणीही प्रज्ञा सातव यांच्याकडे केली. ‘प्रज्ञा ताईंकडे आम्ही माफी मागायला आलोय. त्याला लहान मुलं आहेत. यापूर्वी त्याने असं कधीच केलं नाही. तो नोकरीही करत नाही. त्यामुळे फक्त एकदा आम्हाला माफ करा. यापुढे तो कधीच असं करणार नाही,’ असे आरोपीची आई म्हणाली.
https://twitter.com/SATAVRAJEEV/status/1623360738646695936?s=20&t=XxuNv7880OpV3q9P65JJHQ
काय करतो आरोपी?
आरोपी महेंद्र डोंगरदिवे नोकरी करत नाही, काहीही कमवत नाही, असे त्याच्या आईने प्रज्ञा सातव यांना सांगितले. आमची सून भातशेतावर कामाला जाते. तो शेळ्या वळण्याचं काम करतो. आम्ही सारे त्याच कामावर घर चालवतो. त्यानं जे काही केलं ते नशेत केलं. आम्हाला त्याची चूक मान्य आहे. दोन दिवसांपासून घरी कुणीच जेवलेलं नाही,’ असे महेंद्रची आई म्हणाली.
जनतेशी संवाद साधताना घडला प्रकार
प्रज्ञा सातव कसबे धवंडामध्ये गेल्या असता त्यांच्या कारच्या दाराजवळ महेंद्र उभा झाला. त्यामुळे त्या उतरल्या नाही. थोड्यावेळाने गावकरी आले आणि त्याला बाजुला केले. पण नंतर त्या गावकऱ्यांशी संवाद साधताना महेंद्र अचानक मागून आला आणि त्याने सातव यांना बाजुला ओढून चापट मारली. यामुळे सातव आणि गावकरी गोंधळून गेले होते.
https://twitter.com/NCPspeaks/status/1623635863098851328?s=20&t=XxuNv7880OpV3q9P65JJHQ
Congress MLC Pradnya Satav Attack Accused Mother Says