इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अदानी उद्योग समूहाची स्थिती सध्या आकाशपाळण्यासारखी झाली आहे. कधी उंचावर तर कधी खाली. आठ दिवसांमध्ये गौतम अदानींची संपत्ती निम्म्यावर आली होती. त्यानंतर सोमवारी अदानींच्या तीन कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते त्यामुळे संपत्तीत साडेपाच अब्ज डॉलर्सची भर पडली. त्यामुळे जरासा दिलासा मिळाला होता. पण आता अदानींच्या कंपन्यांवर धाडी पडल्यामुळे पुन्हा एकदा अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
अदानी उद्योग समूह सध्या एकूणच वादाच्या भोवऱ्यात सापडला असताना आणखी एक वाद त्यांनी ओढवून घेतला आहे. या वादाला हिमाचल प्रदेशातील सिमेंटवादाची पार्श्वभूमी आहे. याच वादावरून अदानी उद्योग समूहाच्या औद्योगिक संस्थांवर स्टेट एक्साईज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने छापे मारले आहेत. हिमाचल प्रदेशच्या अबकारी विभागाने ही कारवाई केली असली तरीही अदानींच्या कंपन्यांवर छापे मारल्यामुळे त्याची चर्चा संपूर्ण देशात होत आहे.
हिमाचल प्रदेश येथील अदानी विल्मर ग्रुपच्या स्टोअरवर कारवाई करण्यात आली. एक्साईज विभागातील साऊथ एन्फोर्समेंट झोनच्या टीमने परवाणू येथील अदानी स्टोअरवर जाऊन संपूर्ण अहवाल तपासले. अर्थात या अहवालांमध्ये काय आढळले, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र अदानींच्या सिमेंट कंपन्याही आता यंत्रणेच्या रडारवर आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
मोठा धक्का
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर शेअर्सवर परिणाम झाल्यामुळे अदानी उद्योग समूहाने पूर्ण लक्ष तिकडे केंद्रित केले. पण त्याचवेळी इतर यंत्रणांच्या रडारवर आपल्या कंपन्या आहेत, याची कल्पनाही त्यांनी केली नाही. त्यामुळे सिमेंट कंपन्यांवरील धाडी अदानी उद्योग समूहासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कंपनीने दिले हे स्पष्टीकरण
कंपनीने ५ वर्षे जीएसटी भरलेला नाही, असा आरोप करण्यात आला होता. पण तो चुकीचा आहे. कंपनीने कर चुकविण्यात कुठलीही अनियमीतता दाखविलेली नाही. ही केवळ नियमीत तपासणी होती, अशी प्रतिक्रिया कंपनीच्या प्रवक्त्याने दिली आहे. सरकारी अधिकारी व माध्यमांनी काहीही म्हटले तरीही ही धाड नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Adani Industry Group Raid State Excise Taxation