अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या निवडणुका आटोपताच काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकारण यास कारणीभूत आहे. येथून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे निवडून आले आहेत. तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारण्याबरोबरच अनेक गंभीर घडामोडी घडल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे. खासकरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्यांनी अनेक आरोप केले. आणि आता तांबे यांचे मामा तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निर्णय घेतला आहे. थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे पाठवला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. तसेच, मामा-भाचे यांच्यासह काँग्रेसमधील राजकारणाची राज्यभर चर्चा झडत आहे. निकालानंतर तांबे यांनी काँग्रेसच्या कारभारावर अतिशय गंभीर टीका केली. तसेच, प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केले. त्यापाठोपाठ काँग्रेसमधील अनेक नेत्यांनीही पटोले यांच्या कारभारावर टीका केली आहे. यासंदर्भात हायकमांडकडे तक्रारी करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. हा राजीनामा थोरात यांनी हायकमांडकडे पाठवत थोरात यांनी एकप्रकारे आपली नाराजी प्रकट केली आहे. याची दखल काँग्रेस हायकमांड कशा पद्धतीने घेणार आणि नजिकच्या काळात काँग्रेसमध्ये काय घडामोडी घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/_prashantkadam/status/1622831960187097089?s=20&t=UX8VOFku_i88dGhti3mtjQ
Congress Leader Balasaheb Thorat Resignation Politics