इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतासह जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला. मात्र, शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नानंतर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यात आली. त्यामुळेच कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठे यश येत आहे. मानवानंतर आता प्राण्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यामुळे आता प्राणीही कोरोनापासून बचाव करु शकणार आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात कुत्र्यांवर यशस्वी आणि प्रभावी चाचण्या केल्यानंतर, आता सिंहांवर ५ ठिकाणी क्लिनिकल ट्रायल घेण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने जुनागडच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयात सिंहांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. हरियाणातील हिस्सार येथे असलेल्या सेंट्रल हॉर्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (केंद्रीय अश्व संशोधन संस्था) शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी देशातील पहिली कोरोना लस तयार करण्यात यश मिळविले आहे. लष्कराच्या २३ कुत्र्यांवर त्याची चाचणी यशस्वी झाली आहे.
लसीकरणानंतर २१ दिवसांनी कुत्र्यांमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध अॅन्टीबॉडीज (प्रतिपिंडे) आढळून आली. कुत्र्यांवर यशस्वी झालेल्या चाचण्यांनंतर आता गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणी उद्यानातील १५ सिंहांवर चाचण्या सुरू आहे. सदर लस विकसित करणार्या सेंट्रल हॉर्स रिसर्च इन्स्टिट्यूट, हिसार या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नवीन कुमार म्हणाले की, कुत्रा, मांजर, सिंह, चित्ता, बिबट्या, हरीण या प्राण्यांमध्ये एक प्रकारचा कोरोना विषाणू ठळकपणे दिसून आला आहे. काही महिन्यांपूर्वी चेन्नईतील प्राणीसंग्रहालयात मृत सिंहामध्ये कोविड-19 विषाणूची लागण झाल्याची ओळख पटली होती. कोविडच्या डेल्टा प्रकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे. या कारणास्तव, त्यांनी प्रयोगशाळेत मानवांमध्ये आलेल्या डेल्टा व्हेरिएंट विषाणूला वेगळे केले आणि त्याचा वापर करून लस बनवण्यात यश मिळविले.
सेंट्रल इक्वीन रिसर्च इन्स्टिट्यूट हिसारचे संचालक डॉ. यशपाल सिंग यांनी स्पष्ट केले की, सदर भयानक विषाणू माणसांकडून प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरत असल्याबद्दल अनेक अभ्यास झाले आहेत. त्यामुळे प्राण्यांमध्येही त्याचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. अमेरिका आणि रशियानेही लस विकसित करून प्राण्यांचे लशीकरण सुरू केले आहे. आम्ही आमच्या देशात प्राण्यांसाठी लस तयार करण्यात बराच काळ गुंतलो होतो. आता संस्थेने लस तयार करून प्राथमिक चाचणीत यश मिळविले आहे.