दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी अनेक योजना केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. सध्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या दोन योजनांच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील.
केंद्र सरकारच्या दिव्यांग जन सशक्तीकरण विभागामार्फत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृती, राष्ट्रीय फेलोशीप व निःशुल्क कोचिंग या सहा योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. यापैकी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) मार्फत राबविण्यात येणार आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात थेट वितरीत करण्यात येणार आहे. मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती साठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदत आहे.
दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाचे स्वरूप व पात्रता खालीलप्रमाणे आहे.
मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
इयत्ता 9 वी व 10 वी मधील वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.800, वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.500 शिष्यवृत्ती देय आहे. तसेच पुस्तकांसाठी अनुदान व विकलांग भत्ता ही या शिष्यवृत्ती योजनेत देण्यात येतो. शिष्यवृत्ती लाभासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रूपये 2 लाख 50 हजार ऐवढी आहे. अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in करणे आवश्यक आहे.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
इयत्ता 11 वी पासून पदव्युत्तर पदवी व पदविकासाठी मधील वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.900-1600, वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.550-750 शिष्यवृत्ती देय आहे. तसेच पुस्तकांसाठी अनुदान व विकलांग भत्ता ही या शिष्यवृत्ती योजनेत देण्यात येतो. शिष्यवृत्ती लाभासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रूपये 2 लाख 50 हजार ऐवढी आहे. अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in करणे आवश्यक आहे.
उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती
नामांकित संस्थांमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.3000, वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्यांना दरमहा रू.1500 शिष्यवृत्ती देय आहे. देखरेख भत्ता व वार्षिक पुस्तक अनुदान रू. 5000 देय आहे. वार्षिक रू.2 लाख ट्यूशन शुल्क या शिष्यवृत्ती योजनेत देय आहे. . शिष्यवृत्ती लाभासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रूपये 6 लाख आहे. अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृती
परदेशात असलेल्या विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी व विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. ग्रेट ब्रिटन साठी 9900 पौंड व इतर देशांसाठी 1500 युएस डॉलर वार्षिक देखरेख भत्त्यासह ट्यूशन शुल्क, वार्षिक आत्पकालिन भत्ता, विमान प्रवास भत्ता देण्यात येतो. शिष्यवृत्ती लाभासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रूपये 6 लाख आहे. दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या पोर्टलवर दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय फेलोशीप
देशातील विद्यापीठांमध्ये एम.फील व पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय फेलोशीप देण्यात येते. जेआरएफ पहिल्या दोन वर्षाकरिता रू.25000 तसेच एसआरएफ करिता तिसऱ्या वर्षापासून रू.28000 अभ्यासक्रम कालावधी संपेपर्यंत देण्यात येतात. आपत्कालीन अनुदान, घरभाड्यासह इतर भत्ते देण्यात येतात. या शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत जाहिरात प्रसारित करण्यात येत असते. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा नाही.
स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण
सार्वजनिक व शासकीय क्षेत्रातील विविध पदांसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असतो. यामध्ये स्पर्धा परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेत प्रवेश घेतलेल्या बाहेरच्या शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यास 5 हजार रूपये मासिक विद्यावेतन देण्यात येते. तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना 2500 विद्यावेतन देण्यात येत असते.
वरील सर्व सहा शिष्यवृत्ती योजनांची अदयावत माहिती www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठी प्रपत्र सदर विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.