पंचराम क्षेत्रातील पहिले शिवमंदिर
अमरलिंगेश्वर स्वामी मंदिर (अमरावती)
उत्तर भारतात विशेषत: हिमालयात जेवढी शिवमंदिरं आहेत तेवढी किंबहुना त्याहीपेक्षा जास्त शिवमंदिरं दक्षिण भारतात आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही. हिमाचल प्रदेशातील ‘पंचकेदार’ सारखीच भगवान शंकरांची पांच अतिभव्य आणि देखणी शिवमंदिरं आंध्रप्रदेशांत ‘पंचरामक्षेत्र’ या नावांनी प्रसिद्ध आहेत. हिमालयातील पंचकेदार मंदिरं पांडवांनी बांधली आहेत, असे म्हणतात. तर आंध्र प्रदेशातील पंचराम क्षेत्रातील पाच शिवमंदिरे ही इंद्र, सूर्य, चंद्र, विष्णू आणि कुमारस्वामी यांनी बांधली आहेत, असे सांगितले जाते. आपल्याकड़े फारशी प्रसिधी नसलेल्या या प्रेक्षणीय, कलाकुसरयुक्त, विशाल शिवमंदिरांची माहिती खास ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत.
आंध्र प्रदेशातील गुंटूर पासून ३५ किमी अंतरावर अमरावती नावाचं एक सुप्रसिद्ध शहर आहे. येथे ४० एकर जागेवर भगवान शिवाचे भव्य देखणे मंदिर आहे. ‘अमररामम’ ‘अमरेश्वर’ किंवा ‘अमरलिंगेश्वर’ या नावाने हे शिव मंदिर विख्यात आहे. पंचराम क्षेत्रातील हे पहिले शिवमंदिर मानले जाते.

मो. ९४२२७६५२२७
आख्यायिका
एके दिवशी देवांचा राजा इंद्र भगवान शिवाची पूजा करीत असतांना त्याच्या हातून शिवलिंग खाली पडले. ते शिवलिंग अमरावती येथे जमिनीवर पडताच उंच वाढू लागले. तेव्हा इंद्राने हात लावून ते थोपविले. या गडबडीत इंद्राच्या हाताचे नख शिवलिंगाला लागले आणि त्यातून रक्ताची धार वाहू लागली. इंद्राने शिवाची माफ़ी मागितल्यावर पिंडीतून वाहणारी रक्ताची धार थांबली. परंतु आजही या शिवलिंगावर रक्ताच्या धारेच्या खुणा दिसतात.
सातवाहन राजांची राजधानी आंध्र प्रदेशातील अमरावती ही पूर्वी सातवहान राज्यकर्त्यांची राजधानी होती. पहिल्या शतकात सातवाहन राजांनी महाराष्ट्रातील ‘पैठण’ येथे असलेली आपली राजधानी ‘धरणीकोटा’ येथे हालविली. त्यावेळी अमरावतीला ‘धन्यकटक’ आणि नंतर ‘धरणीकोटा’ म्हणत असत. पहिल्या व दुसऱ्या शतकात बौद्ध धर्माचे प्राबल्य असतांनाही अमरलिंगेश्वरा सारखे अति भव्य हिंदू मंदिर येथे बांधण्यात आले. त्यावरून हिंदू धर्म देखील जोरात होता, असे म्हणता येईल. अमरलिंगेश्वर या महादेवाच्या सुप्रसिद्ध मंदिराभोवती शिल्पकलेचे अनेक सुंदर नमुने आजही पहायला मिळतात. गुरुदेव दत्तांचे जागृत स्थान येथे आहे. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. भाविक मंडळी कृष्णा नदीत स्नान करुनच अमरलिंगेश्वराचं दर्शन घेतात.
इंद्राने स्थापन केलेले शिवमंदिर
येथे शिवाला अमरेश्वर किंवा अमरलिंगेश्वर या नावाने पुजले जाते. येथील शिवलिंग पंधरा फूट उंचीचे आहे. येथे महादेवाच्या पिंडीला अभिषेक करणे हा मोठाच प्रेक्षणीय विधी असतो. हे मंदिर दोन मजली उंच असल्यामुळे वरच्या मजल्यावर जावून महादेवाच्या पिंडीला अभिषेक करावा लागतो. पंचरामक्षेत्र मंदिरांतील पांच मंदिरापैकी येथील शिवलिंग सर्वांत उंच आणि मोठे आहे. येथील शिवलिंग हे अतिशय उंच आहे. मंदिर दोन मजली उंच आहे. त्यामुळे खाली उभं राहिल्यावर पिंडीचा वरचा भाग दिसत नाही, तर वरच्या मजल्यावर गेल्यावर पिंडीचा खालचा भाग दिसत नाही. स्थानिक आख्यायिके नुसार देवांचा राजा इंद्र याने हे मंदिर स्थापन केले आहे.
अमरलिंगेश्वर स्वामी मंदिर तीन टप्प्यात पहावे लागते. पहिल्या भागात महिषासुरमर्दिनी, वीरभद्र स्वामी, गुरुदत्तात्रय, ओमकारेश्वर स्वामी आणि अगस्तेश्वर स्वामींची मंदिरं पाहता येतात. दुसऱ्या राउंड मध्ये विनायक, अंजनेय, नागेन्द्र स्वामी, कालभैरव, कुमार स्वामी आणि वृक्षाखाली विसावलेली भगवान श्रीकृष्णांची मूर्ती पाहता येते. तर तिसऱ्या राउंड मध्ये आणखी थोडं वर चढून गेल्यावर कलाहस्तीश्वर, मल्लिकार्जुन, काशी विश्वनाथ आणि पुष्पदंतेश्वर स्वामी यांचे दर्शन होते. या तीन वर्तुळांच्या मध्यभागी अमरलिंगेश्वर स्वामींचे मंदिर बांधलेले आहे. माता पार्वतीही येथे बाला चामुंडेश्वरी रुपात पुजली जाते.
अठराव्या शतकात जीर्णोद्धार
अठराव्या शतकांत या मंदिराचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला. चितापल्ली येथील धनाढ्य जमीनदार आणि कारभारी वसिरेड्डी व्यंकटाद्री नायडू चितापल्लीहून ३७० किमी अंतरावरील अमरावती येथे स्थायिक झाले. अमर्लिंगेश्वर स्वामींची महती त्यांना पटली होती. त्यामुळे त्यांनी इ. स. १७९२ साली सर्वप्रथम अमरलिंगेश्वर मंदिराचा केवळ जीर्णोद्धारच नव्हे तर कायापालट केला. चाळीस एकर जागेवर पसरलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी अमरावती येथील मार्बलचाच मोठ्या कुशलतेने वापर केला. अमरावतीचा सुप्रसिद्ध स्तूप घडविण्यासाठी देखील याच अमरावती मार्बलचा उपयोग करण्यात आला आहे.
अमरावती शहराच्या मध्यभागी अमरलिंगेश्वर स्वामी मंदिर असून त्याच्या भोवती चारही दिशांना उंच गोपुरे बांधलेली आहेत. आणि या अमरेश्वर मंदिराभोवती त्यांनी अमरावती नगराची सुनियोजित आखणी व उभारणी केली आहे. नवनिर्माणाच्या या प्रक्रियेत त्यांनी अनेक जुन्या पडिक वास्तू व भग्न मंदिरं मुळासकट पाडून त्यावर नवीन नगराची उभारणी केली. अमरलिंगेश्वर स्वामी मंदिराप्रमाणेच अनेक मंदिरांची उभारणी व जीर्णोद्धार वसिरेड्डी नायडू यांनी केला. इ. स. १७९७ साली भारताचे पहिले सर्वेयर जनरल कर्नल कोलिन मेक्यंझी यांनी अमरावती नगराला भेट दिली. वसिरेड्डी नायडू यांच्या नगर उभारणीच्या कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. अमरलिंगेश्वर स्वामी मंदिराच्या घडणीत आणि विकासात धरणीकोटाचे राजे किंग ऑफ कोंडाविदुडू आणि विजयनगरचे सम्राट विजयदेव राय यांचा सहभाग असल्याचा उल्लेख येथील शिलालेखावर पहायला मिळतो.
काय पहावे
अमरावती हे पौराणिक व ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे येथे बरीच प्रेक्षणीय ठिकाण आहेत. पंचरामातील प्रमुख अमरलिंगेश्वर मंदिर येथे आहे. जगप्रसिद्ध बौद्धस्तुपही येथे पहायला मिळतो. याशिवाय बाल चामुंडेश्वरी माता मंदिर, वेणुगोपाल स्वामी, साईंबाबा मंदिर, ललिता पीठं, श्रीराम मंदिर, अमरावती संग्रहालय आवर्जून पहावे असे आहेत.
कसे जावे
अमरावती येथे रेल्वे स्टेशन नाही. जवळचे रेल्वे स्टेशन ३५ किमीवर गुंटूर येथे आहे. गुंटूर ते अमरावती रस्ता चांगला असून सतत वाहतूक चालू असते.