इंडिया दर्पण विशेष लेखमाला
पॅव्हेलिअन
खरे खेळाडू आणि त्यांच्या खिलाडूवृत्तीचे दर्शन
कोणत्याही खेळाच्या मैदानावर जे आजवर कधीही घडलं नाही, ते लेव्हर कपच्या अंतिम सामन्यानंतर बघायला मिळालं. आजवरचा सर्वसाधारण अनुभव असा होता की, कोणत्याही खेळात कायम प्रतिस्पर्धी म्हणून मानला जाणारा एखादा खेळाडू रिटायर झाला तर दुसरा प्रतिस्पर्धी त्या घटनेची फारशी दखल घेत नाही, किंवा “त्याची कारकिर्द चांगली होती” अशा माफक शब्दात त्या घटनेचे वर्णन करतो. परंतु, थोड्या नव्हे तर तब्बल ४० आंतरराष्ट्रीय टेनिस सामन्यात एकमेकांसमोर कोर्टवर उभे राहीलेले रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दोन दिग्गज लेव्हर कपच्या अंतिम सामन्यानंतर परवा अक्षरश: रडतांना बघायला मिळाले आणि त्यांनी चाहत्यांच्या डोळ्यातील पाण्याला देखील वाट मोकळी करून दिली. हा एक विरळाच प्रसंग जगाला अनुभवास आला. यासंदर्भात सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
रॉजर फेडररने आंतरराष्टीय टेनिसमधून केलेली निवृत्तीची घोषणा ही जितकी आश्चर्यकारक होती तितकीच ती सर्वांसाठी वेदनादायक होती याचा पुन्हा एकदा प्रत्यय देणारा तो क्षण होता. खरंतर रॉजर फेडरर स्वित्झर्लंडचा आणि राफेल नदाल स्पेनचा टेनिस खेळाडू. या दोघात फेडरर हा वयाने पाच वर्षांनी मोठा. वर उल्लेख केल्याप्रमाणे हे दोन्ही खेळाडू आत्तापर्यन्त तब्बल ४० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर लढले आहेत. त्यातल्या २४ लढती या नदालने तर १६ लढती या फेडररने जिंकल्या आहेत.
विशेष म्हणजे ग्रॅण्डस्लॅम किंवा एटीपीच्या विजेतेपदासाठी या दोघांमध्ये यापैकी २४ मोठ्या अंतिम लढती झालेल्या असून त्यापैकी १४ नदालने तर १० फेडररने जिंकल्या आहेत. इथे, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? हे ठरविण्यासाठी ही आकडेवारी देण्याचा अजिबात मानस नाही. ही आकडेवारी यासाठी ठेवतोय, की यावरून या दोघांमधले “मैदानावरचे शत्रुत्व” किती प्रचंड होते याची कल्पना सहज येते. परंतु, असे असतांना देखील फेडररच्या विदाईला नदालने अश्रू ढाळणे ही घटनाच अफलातून आहे.
https://twitter.com/LaverCup/status/1573460606274895890?s=20&t=ZxVTqeOOjaBMT-LmkkZ8SQ
लेव्हर कपचा फारमॅटच असा आहे की यात ‘टीम युरोप’ आणि ‘टीम वर्ल्ड’ असे दोन संघ सहभागी होतात. फेडरर, नदाल आणि जोकोविच हे तिघे युरोपीय देशाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने या स्पर्धेत टीम युरोपच्या माध्यमातून ते एकाच टीमचे सदस्य होते. फेडरर आणि नदाल या दोघांचा सहभाग असलेली डबल्स् ची अंतिम लढत पराभूत झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे फेडररच्या फेअरवेलला सुरूवात झाली. यावेळेला नदालही मैदानात होता आणि फेडररचे मनोगत ऐकत होता.
आपल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीचा उल्लेख यावेळी फेडररने “परफेक्ट जर्नी” असा केला. यावेळी बोलतांना भावूक झालेल्या फेडररने आभार मानतांना कुणालाच सोडलं नाही. मी आनंदी आहे आणि दु:खी सुध्दा अशा संमीश्र भावना व्यक्त करतांना फेडररच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. तो बोलत होता आणि एका हाताने अश्रू टिपत होता. एक वेळ अशी आली की फेडरर रडतांना अक्षरश: लहान मुलासारखा झाला आणि त्याने व्यक्त केलेल्या आठवणीतून त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या राफेल नदालला सुध्दा त्याचे अश्रू लपवता आले नाहीत.
https://twitter.com/LaverCup/status/1573456284820570117?s=20&t=ZxVTqeOOjaBMT-LmkkZ8SQ
कोर्टवर समोरासमोर खेळतांना एकमेकांचे फटके अतिशय निर्दयीपणे परतवून लावणारे हे दोघे, या टप्यावर मात्र ओलेचिंब झाले होते आणि आता फक्त त्यांचे अश्रू बोलत होते. ही भावना अवघ्या क्रिडाविश्वासाठी नविन होती. असा निरोप आजवर कुणालाच मिळालेला नाही आणि खेळाचा इतका आदर आजवर कुठल्याच मैदानात झालेला नाही. फेडररसारखे मोठे खेळाडू कधीच रिटायर होत नाहीत ही भावना अधोरेखीत करणारे ते क्षण आहेत. तुमचा प्रतिसर्धी हाच तुमचा हितचिंतक देखील असू शकतो हे खेळातले सौंदर्य फेडरर आणि नदालच्या अश्रूतून अनेकांना बघायला मिळाले.
२००३ साली तब्बल २०० कसोटी सामने खेळून भारतात सचिन तेंडूलकरने निवृत्ती स्विकारली त्यावेळी सचिनने हातात माईक घेतल्यावर तब्बल १४ मिनीटे केलेले भाषण आजही अनेकांच्या स्मरणात असेल. या दरम्यान सचिन असाच अनेकदा भावूक झाला होता. मैदानातले चाहते आणि घराघरात टी.व्ही.समोर बसून त्याचा शब्द न शब्द ऐकणारे प्रेक्षक या १४ मिनीटात अनेकदा पाणावले होते. सचिनच्या बाबतीत घडलेला हा प्रकार मायदेशात झाला होता. फेडररचा फेअरवेल स्वित्झर्लंड मध्ये नव्हता तर तो लंडनच्या कोर्टवर असतांना सुध्दा, देशाच्या सीमारेषा न मानता फेडररला मानणारी चाहत्यांची फौज फेडररसाठी टाळ्या वाजवतांना अजिबात कंजुषी करीत नव्हती.
https://twitter.com/barstoolsports/status/1573461290164551681?s=20&t=ZxVTqeOOjaBMT-LmkkZ8SQ
आपल्या २५ वर्षाच्या कारकिर्दीत फेडररने कमावलेल्या लोकप्रियतेची ती एक झलक होती. “माझ्या आयुष्यातील सुध्दा एक महत्वाचा भाग आज मला सोडून जातोय. कारण मी माझ्या आयुष्यात जे काही महत्वाचे क्षण अनुभवले ते एकतर त्याच्या जवळ असतांना किंवा त्याच्या विरूध्द असतांना मला मिळालेले आहेत”… कुणाच्याही कट्टर प्रतिस्पर्ध्याने केलेला हा असा उल्लेख खिलाडूवृत्तीचाच मानावा लागेल आणि नजिकच्या काळात येणा-या अशा असंख्य खेळाडूंना तो खुप काही शिकवून जाईल हे नक्की.
Column Pavilion True Players and Sportsmanship by Jagdish Deore
Sports Special Article Roger Federer Rafal Nadal