इंडिया दर्पण विशेष लेखमाला – पॅव्हेलिअन
‘थॉमस चषक’ विजेतेपदाचं लख्ख यश
– जगदीश देवरे (इ मेल- pavilionsmailbox@rediffmail.com)
तुम्ही क्रिकेटचा विश्वचषक बघितलाय, फुटबॉलचा विश्वचषक बघितलाय. बॅडमिंटनचा विश्वचषक अशी स्पर्धा अजून जरी खेळली जात नसली तरी बॅडमिंटनच्या इतिहासात ‘थॉमस चषक’ या स्पर्धेला विश्वचषकाइतकेच महत्व आहे. गेल्या ७३ वर्षाच्या या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सहा देशांनी मिळूनच सगळी विजेतेपदं जिंकून घेतलेली असली तरी यंदा मात्र भारतीय बॅडमिंटन संघाने इतिहास निर्माण करून या स्पर्धेच्या इतिहासातले पहिले वहिले विजेतेपद मिळविले आहे.
या अदभूत अशा यशानंतर बॅडमिंटन खेळणाऱ्या अनेक दिग्गज देशांच्या भुवया उंचावल्या आहेत हे नक्की. याआधी १९५२, १९५५ आणि १९७९ या तीन थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत भारतीय संघाने मजल मारली होती. परंतु त्यानंतर थेट इतक्या वर्षांनी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची कामगिरी साधली गेल्याने हे एक घवघवीत यश मानले जाते आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सर जॉर्ज थॉमस यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते.
इंडोनेशिया, चीन, जपान, मलेशिया, डेन्मार्क हे असे देश आहेत ज्यांचा या खेळावर नेहमीच वरचष्मा असतो. इंडोनेशिया ने १४ वेळेला, चीनने १० वेळेला तर मलेशिया ने ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. उपांत्य फेरीत भारताने डेनमार्क वर ३-२ असा विजय मिळवला होता तर अंतिम सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंनी बलाढ्य इंडोनेशियाला ३-० अशी धूळ चारली.
थॉमस कप चषक स्पर्धेचे हे विजेतेपद एक सांघिक विजेतेपद मानावे लागेल कारण या स्पर्धेत सिंगल्स आणि डबल्स अशा दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी केल्याचे दिसून येते. अंतिम फेरीत किदांबी श्रीकांत याला शेवटचा सामना खेळावा लागला. यात त्याने इंडोनेशियाचा नामवंत खेळाडू जोनाथन क्रीस्टी याला सरळ दोन सेटस् मध्ये २१-१३ आणि २३-२ अशा फरकाने पराभूत केले. त्याआधी पहिल्या सामन्यात भारताच्या लक्ष्य सेन या खेळाडूने इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुकाचा ८-२१, २१-१७ आणि २१-१६ असा पराभव केला.
या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर विजेतेपदाचे ‘लक्ष्य’ दूर राहते की काय? असे वाटत असतानाच लक्ष्य सेनने मात्र प्रतिस्पर्ध्यावर पलटवार करून पुढचे दोन्ही सामने जिंकत भारताला एक छान सुरुवात करून दिली. डबल्स मध्ये देखील भारतीय खेळाडूंचे हेच स्पिरीट बघायला मिळाले.भारताच्या सात्विक राज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने पहिला सेट १८-२१ असा गमावल्यानंतर देखील पुढचे दोन्ही २३-२१ आणि २१-१९ अशा फरकाने जिंकून मोहम्मद अहसेन व केविन संजया या जोडीचा पराभव केला.
क्रिकेटवेड्या भारतामध्ये बॅडमिंटन चा प्रसार अजूनही सर्वदूर झालेला नाही. खरेतर या खेळासाठी लागणारे सुसज्ज असे मैदान अजूनही अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये उपलब्ध नाही. पी.व्ही.सिंधू ने ऑलिंपिक पदक पटकावल्यानंतर आणि खास करून खास करून काही मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर बॅडमिंटन खेळाविषयीची जागरुकता आणि बॅडमिंटनचा प्रसार भारतात होतो आहे हे नक्की.
अजूनही दक्षिणेकडील काही राज्यांमधून, विशेष करून हैदराबाद आणि बेंगलोर सारख्या शहरातून यशस्वी खेळाडू पुढे येत असतांना त्या तुलनेत इतर ठिकाणाहून मात्र खेळाडू तयार झालेले दिसत नाहीत. थॉमस कप चषक जिंकल्यानंतर सुनील गावस्करने या विजेतेपदाची तुलना १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट विजेतेपदासोबत केली, ती कदाचित याचमुळे. १९८३ नंतर भारतामध्ये क्रिकेटचा चेहरामोहरा बदलायला एक चांगले वातावरण तयार झाले होते, जे आजही कायम आहे. आता थॉमस चषक स्पर्धेतील विजयानंतर बॅडमिंटनला देखील असेच सुगीचे दिवस येतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.