इंडिया दर्पण विशेष – निसर्ग यात्री
ऊर्जाराणी: डॉ. प्रियदर्शनी कर्वे
ऊर्जेच्या क्षेत्रात एखादी महिला किती लख्ख कार्य करु शकते याचे सोदाहरण म्हणजे डॉ. प्रियदर्शिनी कर्वे. महर्षी धोंडे केशव कर्वे यांची पणती ही तिची दुसरी ओळख. आरती या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम हे डोळे दिपावणारंच आहे. आज आपण या अनोख्या निसर्ग यात्रीची ओळख करुन घेऊ..

मो. 9423932203
लंडनमधल्या ऍशडेन ट्रस्ट तर्फे दिला जाणारा ‘ऐशडेन अवॉर्ड फॉर रिन्यूएबल एनर्जी’ या पारितोषीकाला पर्यावरणक्षेत्रात मानाचे स्थान आहे. त्याला खरंतर ‘ग्रीन ऑस्कर ‘या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते. दरवर्षी या पुरस्कारासाठी जगभरातून शेकडो अर्ज येतात. सर्व प्रकारच्या पुनर्निर्माणक्षम ऊर्जास्त्रोतांचा समाजाच्या उपयोगासाठी वापर करण्याचं कोणतंही तंत्रज्ञान या पुरस्कारासाठी विचारात घेतलं जातं. आणि हा पुरस्कार भारतातच नाही तर आशियातही सर्वप्रथम मिळाला तो डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे यांच्या “आरती”या संस्थेला. बरं एकदा नव्हे ,तर दोन वेळा.
एका छोट्याशा स्वयंसेवी संस्थेने कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळा किंवा अत्याधुनिक उपकरणे नसताना इतकं महत्त्वाचं संशोधन करणं शक्य झालं ते एका तरुण संशोधक मुलीच्या ध्यासाने. डॉक्टर प्रियदर्शिनी कर्वे, शास्त्रज्ञ , प्राध्यापक आणि प्रयोगशील सामाजिक कार्यकर्ती.
डॉ. प्रियदर्शिनी कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांची ही पणती. म्हणजेच दिनकर आणि इरावती कर्वे या दाम्पत्याच्या तीन अपत्यांपैकी डॉ. आनंद कर्वे यांची मुलगी. समाजासाठी धडपडण्याचा वेडा ध्यास हिला वारसाहक्काने मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. डॉ. प्रियदर्शिनी यांचा जन्म पुण्यात झाला पण, बालपण फलटण या गावात गेले. चालत किंवा सायकलवर शाळेत जात असताना हिरव्यागार उसाच्या शेतातून त्यांची रोजची ये -जा.
निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासोबतच उसाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कचरा व्यवस्थापनापर्यंतचे जीवन चक्र त्यांना पाहायला मिळत असे. शेतकरी कापणीनंतर सुकलेली उसाची पानं आणि सेंद्रिय कचरा जाळतात आणि त्याचा विषारी धूर हवेत सोडला जातो. दाट धुरामुळे हवा प्रदूषित होते. आसपासच्या परिसरातही ते प्रदूषण पसरत असे. गावकरी आणि प्राण्यांच्या श्वासोच्छ्वासावर आणि दृश्य मानवतेवर त्यामुळे परिणाम होत असे.
1991 मध्ये विज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुढे पीएचडी करण्यासाठी त्या पुण्यात परतल्या. त्यांच्या शिक्षणाच्या सर्व वर्षांमध्ये कचरा व्यवस्थापनावर उपाय शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला. त्यांना शेतीतील कचऱ्याचं कोळशात रूपांतर करायचं होतं. त्या महाविद्यालयात असतानाच त्यांना आजूबाजूला दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या, अनुभवाला येणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण पदार्थविज्ञानाचे तत्व वापरून एखाद्या गणिती सूत्रद्वारे देता येते हे फार मजेशीर आणि जादूई वाटू लागलं आणि मग याच विषयाचा अभ्यास करून पुढे संशोधक व्हायचं असं डोक्यात पक्क केलं .डॉ. प्रियदर्शिनी फिजिक्समध्ये म्हणजेच पदार्थविज्ञान विषयात पीएचडी आहेत. डॉ. प्रियदर्शिनी कर्वे ह्या पर्यावरणाचा ‘वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्क ‘ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या त्या मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत.
एलपीजी गॅसच्या किमतीत वाढ महिन्याचं बजेट कोलमडलं. पेट्रोलच्या किंमतीत दोन रुपयांनी तर डिझेलच्या किंमती चार रुपयांनी वाढ. वाहतुकीचा खर्च वाढल्याने अन्नधान्य वस्तूंच्या किमती महागणार. या बातम्या हल्ली रोजच्याच झाल्या आहेत. अमाप पैसा खर्च करून आपण खनिज तेल खरेदी करतो हा साठा कधीतरी संपणार आहे याचा विचार न करता. खनिज इंधनाच्या वापरातून वातावरणात अतिरिक्त कार्बन डायॉक्साईड सोडला जातो आणि त्यामुळे तापमान वाढत होत आहे.
शहरी सुखवस्तू घरांमध्ये स्वयंपाकघरात एलपीजीवर चालणारी शेगडी किंवा विजेवर चालणारी शेगडी वापरले जाते. काही काळापूर्वी केरोसीनची शेगडी देखील वापरले जात असे. ग्रामीण घरांमध्ये लाकडं, शेणाच्या गवऱ्या, शेतातला काडीकचरा या पारंपारिक जैवइंधनावर चालणाऱ्या पारंपारिक मातीच्या चुली असतात तर काही ठिकाणी केरोसिनच्या शेगड्या आणि गॅसच्या शेगड्या देखील आता आल्या आहेत. प्रकल्पाच्या निमित्ताने प्रियदर्शनी यांना जैव इंधनावर चालणारी आधुनिक चूल बनवण्याची कल्पना मनात आली.
कास्टफोर्ड प्रयोगशाळेत चुलीवर प्रयोग सुरू असताना चुलीवर काम करताना किती धूर निघतो आणि प्रत्यक्ष त्याचा किती त्रास होतो याचा त्यांनी भयंकर अनुभव घेतला आणि मग या क्षेत्रात केवळ वैज्ञानिकच नव्हे तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनदेखील संशोधन होणं किती गरजेचं आहे हे त्यांच्या मनावर बिंबत गेलं. हे संशोधन प्रयोगशाळेत बसून करण्यासारखं नव्हतं. त्यासाठी ज्या लोकांसाठी त्या चुली बनवायचे आहेत त्यांच्यात मिसळून, त्यांच्या गरजा, मर्यादा समजावून घेऊन हे काम करणं क्रमप्राप्त होतं. बर्याचदा त्यांना अशा प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले की शहरातील लोकं तर सुखवस्तू शेगड्या वापरतात मग ग्रामीण भागातील लोकांनाच केरोसीन आणि एलपीजी सारखी स्वच्छ जळणारी इंधन उपलब्ध करून देण्याऐवजी तुम्ही सुधारित चुली का देत आहात.
त्यावर प्रियदर्शिनी सांगतात, “जैवइंधनासाठी पैशाच्या रूपात मोबदला द्यावा लागत नाही याउलट इतर इंधन पैसे देऊन विकत घ्यावी लागतात. खेडेगावांमध्ये एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरं मिळेपर्यंत बरेच दिवसांचा कालावधी जातो. केरोसीन किंवा एलपीजी खेड्यापाड्यात स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी यंत्रणेवर खर्चाचा बोजा पडतो. तसेच सौरउर्जेसारख्या अपारंपारिक पर्यायाचा विचार करता ग्रामीण जनतेसाठी हा पर्याय तितकासा व्यवहार्य ठरलेला नाही. अशा वेळेला जैवइंधन स्वयंपाकासाठी अधिकाधिक कार्यक्षमतेने आणि प्रदूषण विरहित पद्धतीने काम करते” त्यासाठी मग सुधारित चुली तयार करणे हेच प्रियदर्शनी यांनी ध्येय बनवले.
त्यांची सराई कूकर, हॉट बॉक्स सह मातीची सुधारित सुल ही संकल्पना तर फारच अभिनव आणि उपयुक्त आहे. एक तोंडाच्या चुलीला जोडून मातीच्या ओट्यातच एक खोल खड्डा केला. चुलीतील विस्तवामुळे चूल तापलेलीच असते. या उष्णतेचा या हॉट बॉक्स मध्ये वापर करून घेणे शक्य होतं .ही मातीची हॉट बॉक्स इतर धातूच्या डब्यांच्या हॉट बॉक्स पेक्षा स्वस्त आणि अधिक कार्यक्षम असतात .
कालांतराने इतर इंधनांची कमतरता भासू लागल्यानंतर जैवइंधनच आपल्याला वापरावी लागणार आहेत. त्यासाठी “समुचीत एन्व्हायरो टेक”या संस्थेच्या माध्यमातून शहरातील लोकांनी देखील पर्यावरण पूरक जीवन शैली आत्मसात करावे यासाठी त्या प्रबोधन करत असतात.
भारतीयांसाठी त्यांनी कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटर तयार केले आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आपण आपलं विजेचे बिल,पेट्रोलचा वापर,पाणी वापर,कचरा व्यवस्थापन इत्यादी घरगुती गोष्टीमध्येसुद्धा अंदाजे किती ऊर्जा खर्च करतो आणि आपल्या जीवनशैलीतून किती प्रदूषण वाढवतो, याचा अंदाज घ्यावा यासाठी या साधनाचा वापर केला जातो. त्यांच्या मते, ग्रामीण लोकांना शहरी जीवनशैली आदर्श वाटत असते .शिवाय आश्चर्यकारकरित्या त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागातील लोकांपेक्षा ही शहरी भागात त्यांच्या सुधारित चूल, सराई कुकर यासारख्या उत्पादनांना जास्त मागणी असते. त्यामुळे जर शहरी लोकांनीच आपल्या
जीवनशैलीत जास्तीत जास्त नैसर्गिकता आणली तर खेड्यातील मंडळी देखील त्याकडे आकर्षित होतील. त्यांची पर्यावरणाप्रती असलेली संशोधनाची तळमळ ,त्या केवळ स्त्री आहेत म्हणून त्यांना कुठेच मागे खेचत नाही. दिवसेंदिवस त्यांचे नवनवीन विषयातील संशोधन देशोदेशी कौतुकाचा विषय ठरत आहे. त्यांचा थक्क करणारा संशोधनाचा प्रवास त्यांच्याच “ऊर्जेच्या शोधात” या पुस्तकात विस्तृतपणे वाचता येतो आणि मग “किनारा नसे पामराला” ही ओळ खरोखर त्यांच्यासाठी सार्थ वाटू लागते.