नर्मदा परिक्रमा का करावी
नमस्कार मंडळी,
पर्यटन विषयक माहितीपर लेखमालेत आपण अनेक हटके पर्यटन स्थळांची माहिती घेतली. आजच्या भागापासून आपण हिंदू धर्मशास्रातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेवर माहिती घेणार आहोत. मात्र या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने आपण याबाबत वेगवेगळ्या भागांमध्ये नर्मदा परिक्रमा जाणून घेणार आहोत.

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक
मो. 9689038880
सध्या अनेक भाविक, यात्रेकरु नर्मदा परिक्रमा करण्याच्या विचारात आहेत. अनेकांनी फोन करुनही याबाबत माहिती घेतली. तर काहींनी असेही सांगितले की, नर्मदा परिक्रमा करण्याची खुप इच्छा आहे पण, माझेकडून आता होणार नाही. म्हणून तुम्हीच यावर सविस्तर लिहा. म्हणजे ते वाचूनही परिक्रमा केल्याचे भाग्य लाभेल.
तसे पाहिले तर नर्मदा परिक्रमा ही सर्वात मोठी किंवा जास्त दिवस चालणारी यात्रा आहे. तसेच ती थोडीफार खडतर असल्याने हा विषय एकाच लेखात सविस्तर मांडणे अशक्य आहे. खडतर मी यासाठी म्हटलो की, पुर्ण प्रवास नदीकाठाने आहे. याबाबत थोडक्यात लिहिणे हा या पवित्र यात्रेवर अन्याय होईल. म्हणून आपण वर उल्लेख केल्यानुसार काही भागात हा विषय भाविकांपर्यंत पोहचवणार आहोत. यात आपण सोप्या शब्दात, थोडक्यात पण महत्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न करुया…..
नर्मदा परिक्रमा भाग-१
नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला पुर्ण फेरी मारणे. नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते. नंतर काही काळ ती महाराष्ट्रातूनही वाहते. शेवटी गुजरात राज्यात अरबी समुद्रास मिळते.
नर्मदा परीक्रमा का करावी? यात्रेचे धार्मिक व पौराणिक महत्व, भारतात असंख्य नद्या असतांना नर्मदा परिक्रमाच का करतात, परिक्रमा कुठुन सुरु करावी, कुठे संपवावी, कशी करावी, राहण्याच्या सोयी कशा असतील, किती दिवस लागतील, पायी चालावे लागते का, की वाहनानेही करता येते, वाहनाने परिक्रमा केली तरी पायी किती चालावे लागते, रस्ते कसे आहेत, भोजनाची काय व्यवस्था असते, कपडे कसे परिधान करावे, यात्रा सुरु करतांना करावयाचा संकल्प, किती दिवसांचा कालावधी लागतो? नर्मदा यात्रेशीसंबधी या व अशा अनेक बाबींवर आपण सखोल माहिती घेणार आहोत.
नर्मदा परिक्रमा करतांना यात्रिकाचे आचरण कसे असावे, यावरही प्रकाश टाकणार आहोत. कारण आपला शेजारी एखाद्या सहलीस जाऊन आला, मग आपणही जाऊच अशा वृत्तीने ही यात्रा सफल होत नाही. म्हणून नर्मदा परिक्रमेची माहिती घेतांना यात्रा करणाऱ्याची मनःस्थिती, नीतिमत्ता कशी असावी यावरही माहिती घेणार आहोत.
हिंदु धर्मशास्रात गंगा नदीप्रमाणेच नर्मदेसही पवित्र मानले जाते. नर्मदेचे केवळ दर्शनही मानवास पवित्र करते. नर्मदा परिक्रमा करणार्या भाविकांच्या प्रत्येक पावलाने दु:ख नष्ट होतात. अंत:करण शुद्ध होते व अमर्याद आनंद प्राप्त होतो. असे म्हणतात की, नर्मदा नदीचे १५० स्रोत आहेत. यापैकी कुणीही व कुठेही नर्मदेच्या पाण्याने स्नान केले तरी त्यांच्या शंभर जन्माची पापं तत्काळ नष्ट होतात. अमरकंटक येथील नर्मदा नदीच्या उगमापासून तर सागरापर्यंत दोन्ही बाजूस दहा कोटी तीर्थ आहेत.
ज्या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावली आहे, तेथील मेकल पर्वतावर भगवान शिव, राजा मेकल, व्यासमुनी, भृगुॠषी, कपिलमुनी अशा अनेक ॠषींनी तपश्चर्या केली आहे. नर्मदा परिसरात अश्मयुगीन हत्यारे, डायनोसाॅरच्या अस्थी सापडल्या आहेत. तसेच स्कंदपुराण, रामायण, महाभारत यातही नर्मदेचे वर्णन आढळून येते. हे सांगण्याचा उद्देश नर्मदा नदी पुराण काळापासून वाहते आहे. आजही ती त्याच भक्ती भावाने सागराच्या ओढीने खळखळते आहे.
पुढील भागात आपण यात्रा कुठून सुरु करावी, कशी करावी, किती दिवस लागतात अशा विविध बाबींची माहिती जाणून घेऊ.
(क्रमशः)