इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार – भाग १
अशी सुरू झाली राईड
नमस्कार, मी सौ दीपिका स्वानंद दुसाने ऑल इंडिया फ्रीडम मोटो राईड केल्यानंतर माझा अनुभव येथे कथन करत आहे.
खरंतर हा प्रवास फक्त ७५ दिवसाचा नसून गेल्या बारा वर्षांचा आहे. बुलेट शिकण्यापासून ते संपूर्ण भारत भ्रमंतीपर्यंतचा आहे. हा प्रवास अतिशय विलक्षण आहे. तो आपण आता दर आठवड्याला जाणून घेणार आहोत….

इंदिरानगर, नाशिक
मो. 7972479858
सर्वप्रथम मी माझा थोडा परिचय करून देते. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबाशी संबंधित असून लग्नाआधी बँकेत सर्विस करत होते. तीन बहिणी व एक भाऊ, आई, वडील असा आमचा परिवार. वडिलांचा स्वभाव प्रचंड तापट. मुलींनी मुलींसारखेच असायला हवे, असा त्यांचा अट्टाहास.
परंतु लग्नानंतर माझ्या पतींनी मला बुलेट चालवायला शिकवले. काही दिवस आम्ही दोघेही बुलेटवर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होतो. नाशिक मधल्या बुलेट क्लबचे मेंबरही झालो. काही काळानी मला जुळी मुले झाली. एक मुलगा व एक मुलगी. त्यांच्या बालपणात माझ्या बुलेट प्रवासाला ब्रेक लागला. त्यांचं संगोपन करण्यात चार-पाच वर्ष घालवल्यानंतर माझ्या पतींनी मला पुन्हा नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले. मी पुन्हा नोकरीला लागले.
नोकरी, मुले आणि संसार सांभाळता सांभाळता मी माझ्या बायकिंग करिअरला पुन्हा एकदा सुरुवात केली. 2020 मध्ये *बाईकर्णी नाशिक* या नावाने महिलांना बायकिंग करताना सुरक्षित वाटावे म्हणून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. गेल्या तीन वर्षात या क्लबच्या 25 हून अधिक महिला व मुली सदस्य झाल्या. संसाराचा सर्व कारभार सांभाळत शनिवार, रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी आम्ही महिला आपापल्या गाड्यांवर बुलेट भ्रमंती सुरू केली. एकमेकींच्या मदतीने हा प्रवास सुरू झाला. मग नाशिक, मुंबई, पुणे, इंदूर, गुजरात अशी बरीच भ्रमंती केल्यावर मला एक संधी मिळाली.
All India Motorbike Expedition संस्थेने भारतातील 75 शहरातून 75 दिवसांसाठी आझादीचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्याचे निश्चित केले. त्या अंतर्गत *FIX INDIA APP* चे प्रमोशन निश्चित झाले. याच अंतर्गत 75 बाईकर्सची निवड करण्यात आली. त्यात वुमन एम्पॉवरमेंटच्या अंतर्गत दहा महिलांचा समावेश होता. नाशिक आणि महाराष्ट्रातून एकमेव महिला म्हणून माझी निवड करण्यात आली. ऑल इंडिया राईडसाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना मला अनेक गोष्टींची तयारी करावी लागली. ज्यात सगळ्यात प्रमुख फिटनेस होता. दोन महिने डाएट आणि जिम करून मी सहा किलो वजन कमी केले. माझी बाईकवर बसण्यासाठीची स्ट्रेंथ वाढवली. शिवाय सलग 75 दिवस बुलेटवर प्रवास करायचा असल्यामुळे त्या बुलेटवर कम्फर्टेबल बसता यावे यासाठी विशिष्ट पद्धतीचे बकेट सीट बसवून घेतले. ज्यामुळे नंतर मला कंबर आणि पाठदुखीचा त्रास जाणवला नाही.
सर्वप्रथम माझी निवड झाल्यानंतर घरच्यांची संमती मिळविण्याचे काम माझ्या पतींनी केले. माझ्या पतींचा या माझ्या प्रवासात सिंहाचा वाटा. कारण अकरा वर्षांची जुळी मुलं, सासू-सासरे आणि एक लिओ नावाचा चार पायाचा घरातला सदस्य या सगळ्यांची देखरेख मी राईडला गेल्यानंतर माझ्या पतींनाच करायची होती. परंतु कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी मला लगेच होकार दिला. सासू-सासर्यांची परवानगी पण मिळवून दिली. यादरम्यान मी बरीच चिंतित होते. कारण गणपती, दसरा, दिवाळी हे सगळे सण लगेच येणार होते. परंतु स्वानंद माझे पती यांनी मला धीर देत मी सगळं सांभाळून घेतो असा दिलासा दिला. मग मी तयारीला लागले. दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी माझ्या या प्रवासाची सुरुवात झाली. आणि दिनांक 6 सप्टेंबर रोजी मी दिल्ली येथे पोहोचले. तीन दिवस या राईडसाठी आम्हाला ट्रेनिंग दिले गेले. दिनांक 9 सप्टेंबर रोजी मेजर ध्यानचंद स्टेडियम दिल्ली येथून भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आमच्या राईडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तिथून आमचा प्रवास सुरू झाला.
आता पुढील भागात आपण प्रवासाचा पहिला टप्पा जाणून घेऊ…
सौ दिपिका दुसाने इंदिरानगर, नाशिक मो. 7972479858
Column Bullete Bike India Ride by Deepika Dusane