माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यात सध्या काहीशा थंडी जाणवते आहे. मात्र, येत्या पुढील ५ दिवसात म्हणजे सोमवार दि.२३ पर्यन्त हवामानात बदल होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्या-त्या ठिकाणच्या पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू साधारणपणे २ ते ३ डिग्रीने वाढ होईल. म्हणजेच थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.
निरभ्र आकाश व स्वच्छ सूर्यप्रकाशातून दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा २ डिग्रीने झालेल्या वाढी होईल असे दिसते. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच ऊबदारपणा जाणवतच होता, तो तसाच अजून पुढील ५ दिवस टिकून राहील, असे जाणवते. पावसाळी ढगाप्रमाणे एकामागोमाग पळणाऱ्या पण वेगवेगळ्या उंचीवरून आणि २ ते ३ दिवसाच्या अंतराने सध्या उत्तर भारतातून सतत जाणाऱ्या पश्चिमी झंजावाताचाही परिणाम होणार आहे.
उत्तरेत सध्या पाऊस/बर्फ, धुके, थंडी पडतच आहे. दि. १९ ते २६ जानेवारी पर्यन्त अश्या दोन झंजावाताचा परिणाम उत्तर भारतात जाणवेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही जाणवते. पण थंडी पडण्यास त्याचा अपेक्षित परिणाम आपल्याकडे महाराष्ट्रात जाणवत नाही. कारण सध्या महाराष्ट्रात जमिनीपासून हवेच्या अधिक उंच जाडीत, अस्तित्वात असलेल्या उच्च दाबामुळे, घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्या (अँटीसायक्लोनिक विंड) मुळे. उत्तरेकडून आपल्याकडे झेपावणाऱ्या थंडीला तयार होणारा रोध, महाराष्ट्रात कडाक्याची थंडी अजूनही जाणवू देत नाही. अर्थात कडाक्याची आवर्तने ह्यापुढेही येऊ शकतात.
सध्या विशेष इतकेच!
Cold Winter Forecast Weather Climate