नाशिक / दिंडोरी : पेट्रोल डिझेलचे सातत्याने भाव वाढत असल्याने अनेक वाहनचालकांनी सीएनजी वाहनास पसंती देत वाहनांमध्ये सीएनजी किट बसवले मात्र पेट्रोल पाठोपाठ सीएनजीचे ही भाव वाढल्याने अन अपुऱ्या सीएनजी पुरवठ्याने वाहन धारक त्रस्त झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी जास्तीत जास्त सीएनजी पंप सुरू करून २४ तास गॅस पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी,पळसे,ओझर ,चांदोरी,दोडी,पिंपळगाव,वडाळी भोई तर शहरातील जेलरोड बिटको व पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंप सुरू झाले आहे. मात्र या सर्व ठिकाणी अपुरा सीएनजी पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून होत असून रात्री पासूनच वाहनांची रांग लावावी लागत असून. सकाळी १० पर्यंत गॅस संपून जात आहे. पुणे ,मुंबई गुजरातमधून दररोज शेकडो वाहने येत असून जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सीएनजी गाड्या वाढत आहे. बाहेरील वाहनधारक रात्रीच लाईनला गाड्या लावत तिथेच झोपत आहे. स्थानिक वाहनधारक सकाळी गॅस भरण्यास गेले असता मोठी लाईन लागलेली असते व त्यांना गॅस मिळत नाही. .जिल्ह्यातील अनेक पंपावर सीएनजीचे काम झाले आहे. मात्र ते अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे सुरू करण्यात आलेले नसून काहींचे संथ गतीने काम सुरू आहे. लाईन मध्ये गाडी चालू बंद करत मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाया जात असून आता सीएनजीचे भाव दोन तीन रुपयाने वाढले आहेत. त्यामुळे ज्यांनी पेट्रोल गाडीला महागडे सीएनजी किट बसवून त्यांना पस्तावा करावा लागत असून आगीतून उठून फुफाट्यात पडल्याची अवस्था झाली आहे.
ढकांबे,दिंडोरी तील पंप लवकर सुरू करावे
दिंडोरी वणी परिसरात अनेक वाहने सीएनजी वरील आहे तसेच गुजरात मधून दररोज शेकडो वाहने येतात मात्र नाशिक कळवण सापुतारा रस्त्यावर पंप नसल्याने वाहनधारक यांची गैरसोय होत आहे.
ढकांबे येथील सीएनजी पंपाचे काम पूर्ण होऊन सहा सात महिने झाले. मात्र अद्याप तो सुरू झालेला नाही. दिंडोरीतही श्री स्वामी समर्थ पंपाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र लॅाकडाऊनमुळे ते संथ गतीने सुरू आहे. तरी दोन्ही पंप लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
सहनशीलतेचा अंत पाहू नये
सीएनजी साठी नागरिक मध्यरात्री पासून रांगा लावून असतात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडे वारंवार मागणी करून अधिक पंप सुरू केले जात नाही की पुरवठा वाढवला जात नाही. लोकांना रांगेत उभे करत सदर कंपनीचे अधिकारी जनतेची मजाक करत असून वाहनधारकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये
सुरेश खंबाईत, नाशिक