मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनांनी संप सुरू केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तसेच, दिवाळीच्या सुटीनिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप आणि आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे त्याचा मोठा प्रभाव सध्या राज्यात दिसून येत आहे. संपाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात गेला. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या बैठका आणि कामही सुरू झाले आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब हे कर्मचारी संघटनांशी चर्चा करीत असले तरी तोडगा निघालेला नाही. आम्हाला सरकारी सेवेत सामावून घ्या यासह अन्य मागण्यांवर कर्मचारी संघटना ठाम आहेत. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाची दखल अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी एसटी कामगार संघटना आणि कर्मचारी यांना कळकळीचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.
अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.
राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1458353318057574403