मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. पण या विधानसभेचे रणांगण महाराष्ट्रातील नेत्यांनी गाजवले, हे संपूर्ण देशाने बघितले. त्यातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी याच निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा घेतला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटकात प्राचारासाठी जाण्यामागचे कारण सांगितले आहे.
एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरीही ते भाजपच्या भरवश्यावर आहेत. त्यामुळे त्यांना केंद्रातून आदेश आला की तो पाळावाच लागतो. तशीही भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत आहे. त्यामुळे शिंदेंनी केंद्रातून आलेला आदेश पाळला, अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीही एकनाथ शिंदेंवर कर्नाटकच्या मुद्यावरून टीका केली होती.
राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. इथले प्रश्न अजून सुटलेले नाहीत. त्याकडे लक्ष देण्याऐवजी आपले मुख्यमंत्री कर्नाटकच्या निवडणुक प्रचारात जाऊन बसले. त्यांना इकडे महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही, तिकडे कर्नाटकात कोण ओळखणार, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता शरद पवार यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असले तरीही ते शिवसेनेचे नेते आहेत. अश्यात कर्नाटकात भाजपसाठी मतदान मागण्याची काय गरज आहे, असाही सूर ठाकरे गटातून उमटला आहे.
सरकारला भीती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या तर पितळ उघडे पडेल या भीतीने सरकार या निवडणुका लांबणीवर टाकत आहे. सरकार लोकांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे, असेही शरद पवार म्हणाले.
हा तर शपथेचा भंग
निवडणुकीचा अर्ज भरताना, राज्यपालांपुढे शपथ घेताना आमचा लोकशाहीवर आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे, अशी शपथ आपण घेतो. दुर्दैवाने धर्माच्या आणि जातीच्या नावाने मते मागून या शपथेचा भंग होत आहे. देशाचे पंतप्रधान जेव्हा अश्याप्रकारची भूमिका मांडतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं, अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1655604870999838720?s=20
CM Eknath Shinde Karnataka Election Campaign Reason