मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार दिवसांपूर्वीच प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रिपाईचे प्रमुख रामदास आठवले यांची नाराजी सहन करावी लागली होती. कवाडेंना महायुतीत घेण्यापूर्वी आमच्यासोबत विचारविनिमय करायला हवा होता, असे त्यांचे म्हणणे होते. आता तर वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गुप्त चर्चेनंतर चांगलच वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बंदद्वार चर्चा केली. यावेळी केवळ दोघेच होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या भेटीची चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीने खळबळ माजली आहे, असे म्हटले तरी चालेल. कारण आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या साऱ्यांकडून हिरवा कंदील होता. एकदा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर युतीच्या अटी व धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. त्यावर सविस्तर विचारविनिमय सुरू असतानाच आंबेडकर आणि शिंदे यांच्यात झालेली बंदद्वार चर्चा महाविकास आघाडीसाठी संभ्रम निर्माण करणारी आहे.
वर्षावर चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बुधवारी मध्यरात्री जवळपास अडिच तास दोघांमध्ये चर्चा झाल्याचे पुढे आले. राजकीय अजेंडा असल्याशिवाय अडिच तास बंदद्वार चर्चा करण्याचं काहीही एक कारण नाही, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
इंदू मीलचा विषयच नाही
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही बैठक इंदू मीलच्या संदर्भात होती, असे म्हटले आहे. पण इंदू मीलच्या संदर्भातील बैठक मध्यरात्री कशाला होईल आणि तसे असेल तर तिथे प्रशासकीय अधिकारी का नव्हते, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. काहीही झाले तरी कवाडेंनंतर आंबेडकरांसोबत झालेली ही भेट महाराष्ट्रातील राजकारणात नव्या बदलांचे संकेत देत आहेत, एवढे मात्र नक्की.
आंबेडकरांनी घातली ही अट
शिंदे गटाने जर भारतीय जनता पक्षाची साथ सोडली तर वंचित बहुजन आघाडी शिंदे गटासोबत युती करेल, असे प्रकाश आंबेडकर .ांनी स्पष्टपणे सांगितल्याचे समजते. आंबेडकर यांची ही प्रमुख अट असल्याने शिंदे गटासोबत त्यांची युती होणे कठीण असल्याचे स्पष्ट होते. कारण, शिंदे गटाने जर भाजपची साथ सोडली तर सरकार कोसळेल आणि विना सत्ता शिंदे गटाला फारशी किंमत राहणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
CM Eknath Shinde and Prakash Ambedkar Midnight Meet Politics
Yuti Alliance Discussion