मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यातील नाशिक पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसने अखेर विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. डॉ.तांबे हे काही वेळातच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भारतीय जनता पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने नक्की कुणाला उमेदवारी मिळणार, शेवटच्या क्षणी कुणाला संधी दिली जाणार, याबाबत मोठेच औत्सुक्य आहे.
भारत निवडणूक आयोगाद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी ही निवडणूक ३० जानेवारी २०२३ राेजी होणार आहे. डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य ७ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाले आहेत. या रिक्त पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
यांच्यात आहे घमासान
काँग्रेसचे आमदार सुधीर तांबे हेच पुन्हा उमेदवार असतील असे सांगितले जात होते. मात्र, त्याऐवजी त्यांचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आता काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप उमेदवार निश्चित केलेला नाही. भाजपकडून राजेंद्र विखे-पाटील यांना संधी मिळण्याची दाट चिन्हे आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे ते लहान बंधू आहेत. तसेच, प्रवरा शिक्षण संस्थेचे ते कुलपती आहेत. भाजपकडून आता कुणाला उमेदवारी दिली जाते, याची सर्वांना उत्सुकता आहे.
The Congress President, Shri Mallikarjun Kharge, has approved the proposal for the candidature of Dr. Sudhir B. Tambe as party candidate for the ensuing biennial election to the Maharashtra Legislative Council from Nashik Division Graduates' Constituency. pic.twitter.com/zYxde91Fva
— INC Sandesh (@INCSandesh) January 12, 2023
निवडणूक कार्यक्रम असा :
गुरुवार दि. ५ जानेवारी २०२३ रोजी या निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध. गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल, सोमवार दि. १६ जानेवारी २०२३ ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख असेल. सोमवार दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होईल.
महाविकास आघाडीची निश्चिती
नाशिक – काँग्रेस – डॉ. सुधीर तांबे
अमरावती – काँग्रेस
औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेस
नागपूर – शिवसेना
कोकण – शेतकरी कामगार पक्ष
हे आहेत भाजपचे उमेदवार
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ – डॉ. रणजित पाटील
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ – किरण पाटील औरंगाबाद
कोकण विभाग शिक्षक मतदार संघ – ज्ञानेश्वर म्हात्रे
Vidhan Parishad Election Nashik Graduate Candidates not Declared
Satyajit Tambe Sudhir Tambe Rajendra Vikhe Patil
Ahmednagar North Maharashtra