मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सतत रस्सीखेच सुरू असतो. कधी न्यायालय किंवा आयोगाच्या निर्णयांमुळे निर्माण होतो, तर कधी जुन्या प्रकरणांमुळे. आता शिंदे गटापुढे एक नवे संकट उभे झाले आहे आणि त्याला निमित्त ठरत आहेत आमदार सदा सरवणकर. गेल्यावर्षी पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडल्याच्या प्रकरणात सरवणकर अडचणीत आले आहेत.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी शिंदे गट व शिवसेनेत प्रभादेवी येथे राडा झाला होता. एकमेकांना डिवचल्यावरून झालेला हा राडा दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. पण पोलीस स्टेशनमध्ये गर्दीच्या ठिकाणी गोळी झाडल्याचा आवाज आला आणि एकच गोंधळ उडाला. सरवणकर यांच्यासह काहींवर आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.सरवणकर यांनी मात्र आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते. पण, या घटनेनंतर सरवणकर यांच्याविरोधात कारवाईची मागणी होऊ लागली. पण पोलिसांनी तपास सुरू केला आणि आता बॅलेस्टिक अहवालात आढळलेल्या बाबी सरवणकरांसाठी मोठी अडचण घेऊन आल्या आहेत.
रिव्हॉल्व्हर जप्त
घटनेनंतर लगेच सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली. या बंदुकीचा परवाना सरवणकर यांच्याकडे होता. घटनास्थळावरील काडतूस आणि सरवणकर यांची बंदूक न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. सर्व बाजुंनी तपास करण्यात आला.
सरवणकरांनीच झाडली गोळी
न्यायवैद्यक प्रयोगशाळेने बॅलेस्टिक रिपोर्ट देत त्यामध्ये बंदुक आणि काडतुसाचे नमुने जुळले आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटली होती, हे सिद्ध झाले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानुसार सरवणकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका बसू शकतो.
मला काहीच माहिती नाही
न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा बॅलेस्टिक रिपोर्ट आल्यानंतर सदा सरवणकर यांच्या अडचणी वाढणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अहवालाबाबत मला काहीच माहिती नाही, असे ते म्हणाले. तसेच पोलीस चौकशी करीत आहेत, एवढीच माहिती आपल्याला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी एकाला होणार अटक
शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांना तर भाजपच्याच एका पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्याच्या प्रकरणात अटक होण्याची शक्यता आहे. भाजपचे वागळे इस्टेट मंडळाचे सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्यावर रेपाळेंनी हल्ला केला होता. रेपाळेंसह तिघांविरुद्धचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यामुळे अटकेची शक्यता वाढली आहे.
Politics Crime Shinde Group MLA Sada Sarvankar Trouble Police
Evidence Revolver Fired Bullet Mumbai