नाशिक – आधुनिक शहरात खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अत्याधुनिक वाहतुक सेवा सुरु झाल्यामुळे नागरिक सेवेला पसंती देतात व खासगी वाहने कमी होतात. नाशिकमधील सीएनजी बसेस आणि लवकरच नावारुपाला येणारा निओ मेट्रो प्रकल्प यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होणार आहे.
कालिदास कला मंदिर येथे संपन्न झालेल्या शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. गेल्या काही दिवसापासून या सिटी बसची सेवेची नाशिककरांना प्रतिक्षा होती. यावेळी ५० बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळयासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, बसमध्ये प्रवास करण्यासाठी मोबाईलवर एका क्लिकवर तिकीट बुक करता येणार आहे. बसमध्ये कॅमेरे आहेत. अत्याधुनिक सेवा असल्याचेही त्यांनी सांगितले. इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली वापरली गेली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक प्रतिसाद मिळेल..त्यामुळे या सेवांचा लाभ घेताना एकाच तिकीटावर प्रवास करता येणे शक्य होईल. पुढे अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त नाशिक होण्यास मदत होईल.