नवी दिल्ली – चीनचे मनसुबे कधीच चांगले नव्हते हे संपूर्ण जगाने कित्येक शतकांपासून अनुभवले आहे. चीनवर राज्य करणारी कम्युनिस्ट पार्टी तर सातत्याने विस्तारवादी भूमिकेत असते. आता पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा ही भूमिका प्रभावीपणे मांडली आणि त्यातून जगाला एक नवे आव्हान दिले आहे.
चीनच्या विस्तारवादाचे प्रयत्न भारत सातत्याने अनुभवत आला आहे. आता पाकिस्तानाशी मैत्री करून तेथेही आपला जम बसविण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. माओत्से तुंग यांनी सोव्हिएत संघापासून प्रेरणा घेऊन १ जुलै १९२१ ला सीसीपीची स्थापना केली. त्यावेळी देशाला गरिबीतून बाहेर काढणे आणि चारशे वर्षांपूर्वी ज्या स्थितीत होता त्या स्थितीत आणणे असा पक्षाचा उद्देश होता.
एकेकाळी भारत आणि चीन जगात व्यापारामध्ये अधिराज्य गाजवत होते. मात्र काळाच्या ओघात दोन्ही देश मागे पडले आणि जगातील गरीब देशांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. जागतिक व्यापारात चीनची भागिदारी ३० टक्के होती. १९४१ पर्यंत ती अर्ध्या टक्क्यावर येऊन पोहोचली.
दुसऱ्या महायुद्धानंतर समीकरणे बदलली आणि चीनच्या नेत्यांना श्रीमंत देशांपुढे अपमानित व्हावे लागले. या अपमानाने विचलित न होता चीनचे नेतृत्व देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. आज चीनची भागिदारी जागतिक व्यापारात २० टक्के आहे.
नागरिकांकडे अधिकार नाहीत
आपण लोकशाहीत जनतेच्या मतदानातून सरकार स्थापन होतोना बघतो, पण साम्यवादात एकाच पक्षाचे राज्य चालते. चीन त्याचे मोठे उदाहरण आहे. चीनच्या नागरिकांकडे काही खास अधिकार नाहीत. त्यावर जग काय विचार करेल, याचा विचारही तेथील नेतृत्व करीत नाही.
बेजबाबदार राष्ट्र
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीनकडे एक बेजबाबदार राष्ट्र म्हणून बघितले जाते. मानवाधिकारांचे उल्लंघन करून सातत्याने शेजारी राष्ट्रांना धमकावत राहणे, हा चीनचा स्वभाव आहे. आपल्याशी असहमत लोकांचे दमन करणे आणि गरीब देशांवर (पाकिस्तानसारख्या) जाळे फेकणे, यावर लक्ष केंद्रीत केले जाते. तरीही चीनने गरिबीवर मात करण्यात यश मिळविले, याचे कौतुक जगभरात केले जाते.