इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे अडीच ते तीन वर्षांपूर्वी जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूमुळे कोट्यावधी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच अब्जावधी रुग्ण दवाखान्यात दाखल झाले होते. विशेष म्हणजे हा विषाणू सर्वप्रथम चीनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर तो जगभरातील बहुतांश देशांमध्ये पसरला होता. त्या पाठोपाठ चीन मधूनच अशाच प्रकारचे अनेक विषाणू पसरल्याचे नंतरच्या काळात आढळून आले. मात्र जगभरातील अनेक देशांनी कोरोनासह अन्य विषाणूंवर मात करीत स्वतःला सावरले. आता पुन्हा एकदा चीन मधून एक चिंताजनक वार्ता आली आहे. नवीनच एक विषाणू तेथे पसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चीन ही काही जणू विषाणू पसरवण्याची प्रयोगशाळाच आहे की काय असा आरोप करण्यात येत आहे.
कोरोना आणि मंकिपॉक्सनंतर आता चीनमध्ये आणखी एक जीवघेणा विषाणू आढळून आला आहे. झुनोटिक लंग्या असे त्या विषाणूचे नाव असून चीनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांना याची लागण झाली आहे. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात अनेक देशांची हानी झाली होती. त्यानंतर आता या भलत्याच आजारामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत सुमारे पाच टक्के कुत्री आणि दोन टक्के शेळ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राणी असणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात लांग्या हेनिपा विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरू शकतो.
तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी सांगितले की, अभ्यासातून असे दिसून आले आहे की विषाणूचा मानव ते मानव प्रसार होत नाही. सदर विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये पसरू शकत नाही. तरीही या विषाणूबाबत अधिक माहिती येईपर्यंत सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, पाळीव प्राण्यांवर केलेल्या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, आतापर्यंत शेळ्यांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये अशी प्रकरणे आढळून आली आहेत. ते म्हणाले की २५ वन्य प्राण्यांच्या प्रजातींवर केलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष असे सूचित करतात की श्रू हा उंदरांसारखा दिसणारा एक लहान कीटकभक्षी सस्तन प्राणी हे लंग्या हेनिपा विषाणूच्या प्रसाराचे मुख्य कारण असू शकते.
इतकेच नव्हे तर ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ए झूनोटिक हेनिपा व्हायरस इन चायना‘ या अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये एक नवीन हेनिपा विषाणू आढळून आला आहे, जो मानवांमध्ये तापाच्या आजाराचे कारण आहे. या विषाणूची लागण झालेल्या ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे रुग्ण एकमेकांच्या संपर्कात नव्हते. एवढचं नाही तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर नागरिकांनाही या विषाणूची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसात पसरण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.
लंग्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळणे, डोके दुखणे उलट्या होण्यासारखी लक्षणे आढळून येतात. तसेच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. एवढचं नाही तर हा आजार बळावला तर रुग्णाचे यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसचं प्रकरण समोर आल्यानंतर त्यांचा प्रकोप वाढत गेला. सध्या जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण आढळते आहे. या जीवघेण्या परिस्थितीमध्ये मागील वर्षी चीनमध्येच आणखी एक भीतीदायक आता एक नवा व्हायरस समोर आला होता . त्याचे नाव ‘हंता व्हायरस’ असे होते.
आरोग्य तज्ज्ञांनुसार कोरोना विषाणूसारखा हंता विषाणू प्राणघातक नाहीय आणि उंदीर, खारू ताईच्या संपर्कात मनुष्य आला तर हा विषाणू पसरतो. चीनच्या युन्नान प्रांतात याच हंता विषाणूमुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोबतच हंता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही, मात्र जर कुणी व्यक्ती उंदरांची विष्ठा, मूत्र इत्यादींना स्पर्श करत असेल आणि त्याच हातानं आपल्या नाका-तोंडाला स्पर्श करत असेल तर हा विषाणू पसरत होता. आता यावर्षी आणखी हा नवीन लंग्या या विचित्र नावाचा व्हायरस आल्याने सर्वांची झोप उडाली आहे.
China New Virus Infection Peoples Alert Disease