नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील बुद्धिबळाविषयक पहिले संकेतस्थळ आणि ऍप तयार करणारे युवा उद्योजक, बुद्धिबळपटु विनायक वडिले यांचे “इव्हील आय ऑफ चेस” या बुद्धिबळाविषयक पुस्तक प्रकाशित झाले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे सूत्र केंद्रस्थानी ठेवत जगविख्यात ७ बुद्धिबळपटूच्या जीवनविषयक गोष्ट या पुस्तकात सांगण्यात आली आहे. लेखकाकडून कोव्हीड १९च्या पहिल्या लॉकडाउनच्या काळात या पुस्तकासाठी संशोधन आणि लेखन करण्यात आले. या पुस्तकातील प्रत्येक बुद्धिबळपटूंचे विशेष चित्र सतीश सोनवणे यांनी रेखाटले तर पुस्तकाचे मुखपृष्ट अभिषेक वर्मा यांनी तयार केले. तसेच या पुस्तकासाठी राजेश्वरी चव्हाणके यांची विशेष मदत लाभली. हे पुस्तक ऑनलाईन अमॅझॉन, फ्लिपकार्ट, किंडल, गुगल बुक या माध्यमांद्वारे पुस्तक विकत घेता येणार आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकवरे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा, सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहुल रनाळकर, यिनचे विभागीय कार्यकारी अधिकारी गणेश जगदाळे, योगशिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी, बुद्धिबळपटू भूषण पवार, अजिंक्य तरटे आणि दत्तनगरी ढोल पथकाचे ढोलवादक उपस्थित होते.
या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकवरे यांनी लोकशाहीची तत्वे युवकांना नेतृत्व घडविण्यासाठी उपयुक्त करणे व त्यांना योग्य संस्काराची जाणीव करून देणे याबाबत आपले विचार मांडले . बुद्धिबळासारख्या खेळाचे पुस्तक नवतरुण पिढीसाठी प्रेरकता बनेल असा विश्वासही यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सचिन जोशी यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी जीवनकौशल्ये यावर प्रकाश टाकला. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा यांनी भावनिकता आणि खेळातील यशस्विता यावर प्रकाश टाकला आणि विनायक यांच्या काही आठवणी सांगितल्या तर योग शिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी यांनी जीवनातील शारीरिक कसरती यांचे महत्व आणि विनायक यांच्या काही घटनांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी डोमसे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जगदाळे यांनी केले.
chess Player Vinayak Wadile Book Publication