चांदवड – लासलगाव -मनमाड रस्त्यावर ३२ वर्षीय तरु णाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहे. त्यामुळे लवकरच आरोपींना पकडण्यात येईल असा विश्वास चांदवड पोलिसांनी व्यक्त केला आहे . या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केल्यानंतर जनावरांच्या अवैध खरेदी – विक्रीतून अनिल आहिरे (३२) रा. पिंपळगाव धाबळी याची ही हत्त्या झालेली असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. ६ फेब्रुवारी रोजी रविवारी अनिल पिकावरील औषधे आणण्यासाठी मित्रा सोबत जात असल्याचे कारण सांगून गेला होता, मात्र रात्री तो परत आला नाही अशी माहिती त्याच्या भावाने पोलीसांना सांगीतली. अनिल हा जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायचा असेही त्याने पोलीसांना सांगितले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड पासून जवळ लासलगाव मार्गावर एक मृतदेह आढळून आल्याची महिती मिळाली होती.या घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, गजानन राठोड, हरिश्चंद्र पालवी , अनिल पवार, नरेंद्र सौंदाणे , उत्तम गोसावी, सलीम शेख, नरवटे,झाल्टे, खैरनार,चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता रक्ताच्या थारोळ्यात या तरुणाचा मृतदेह आढळून आलेला असून त्याच्या डोक्यावर , पोटावर, हातावर, धारदार हत्त्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आल्याचे निदर्शनास येते जवळच त्याची मोटारसायकल असून सोबत दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या होत्या. पोलीसांनी तपास सुरू केल्यानंतर मयत तरुणाचे नाव अनिल आहिरे असून तो चांदवड तालुक्यातील पिंपळगाव (ढाबळी) येथील असल्याचे निष्पन्न झाले.पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन मार्फत सुरु असून आहे. लवकरच या खुनाचे धागेदोरे होती लागतील असा विश्वास पोलीसांनी व्यक्त केला आहे.