मधूर गुजराथी
चांदवड – तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर भीषण अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले. मालेगाव कडून नाशिक कडे जाणारी स्विफ्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव (४०) राहणार भरवीर यांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. तर त्यांच्या पाठीमागे बसलेले गोवर्धन ढोमसे व दशरथ ढोमसे राहणार गोरठाण हे दोघे गंभीर जखमी झाले .अपघाताचे वृत्त समजताच सोमा कंपनीचे रवींद्र अहिरे बंटी बोरसे, मंगेश पवार, राहुल ठाकरे , राजू सोमवंशी ,समाधान शिंदे , अमोल मोरे यांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्य केले मयत व जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्विफ्ट कार मधील कोणालाही दुखापत झाली नाही. चांदवड् पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत .