चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याचा प्रश्न अतिशय जटील झाला असून यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दिवसेंदिवस कांद्याचे भाव कोसळत आहेत. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. अखेर आता शेतकऱ्यांनी थेट स्वेच्छामरणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात संतप्त शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र पाठविण्यास प्रारंभ केला आहे.
येथे काल पासून कृषी बाजार समितीत कांदा प्रश्नावर उपोषण करण्यात येत असून आज या शेतक-यांनी थेट राष्ट्रपतींकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी अशी मागणी करणारे पत्र पाठवायला सुरुवात केली आहे. शेतमालाच्या कांदा व द्राक्ष तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास केंद्र व राज्यसरकार सातत्याने अपयशी ठरले असून शेतक-यांना त्यांच्या कुटूंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले आहे. शेतक-यांना प्राण त्याग करण्यावाचून पर्याय नसल्याने मला स्वेच्छा मरण्याची परवानगी मिळावी अशा आशयाचे हे पत्र असून अनेक शेतक-यांनी त्यावर स्वाक्षरी करत ते पत्र राष्ट्रपतींकडे पोस्टाने पाठविले जाणार आहे.