नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)च्या पथकाने गुरुवारी रात्री नाशकात मोठी कारवाई केली. लष्कराच्या हवाई प्रशिक्षण केंद्र (कॅट)चा मेजर आणि ज्युनिअऱ इंजिनिअर या पथकाच्या सापळ्यात अडकला आहे. या दोघांना थोड्याच वेळात नाशिक न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सीबीआयच्या पथकाद्वारे या दोघांसह अन्य जणांची कसून चौकशी सुरू होती.
गेल्या कारवाईत सीबीआयने वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील कर्मचाऱ्यांला लाच घेताना ताब्यात घेतले होते. आता सीबीआच्या हाती मोठे मासे गळाला लागले आहेत. नाशिकमधील लष्कराच्या मेजरसह एका इंजिनिअरला सीबीआयच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. नाशिकमध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) कार्यरत आहे. याठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचे प्रशिक्षण दिले जाते. हे भारतातील एकमेव मोठे केंद्र आहे. विशेष म्हणजे, याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. आणि याच केंद्रात सीबीआयचे पथकाने मोठी कारवाई केली आहे. कॅटमध्ये कार्यरत असलेला मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोन्ही एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबआयच्या पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांनी इंडिया दर्पणशी बोलताना दिली आहे.
सीबीआयच्या या कारवाईमुळे केवळ कॅटच नाही तर संपूर्ण लष्करामध्येच खळबळ उडाली आहे. लष्करात लाचखोरीची फारशी कारवाई होत नाही. त्यातच या कारवाईत मेजर दर्जाचा अधिकारीच सापडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच, ही लाच किती रुपयांची होती, कशासाठी घेतली जात होती यासह अन्य बाबी अद्याप उघड झालेल्या नाहीत. सीबीआयचे पथक अद्याप कॅटच्या आवारातच असून दोघांसह अन्य बाबींची कसून चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अधिक बाबी उजेडात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सीबीआयचे पथक आज दुपारी या दोघांना नाशिक न्यायालयात हजर करणार आहे. या दोघांची पोलिस कोठडी मागितली जाणार आहे. त्यांची कसून चौकशी करतानाच लाचखोरीविषयीचे अनेक धागेदोरे शोधण्यासाठी सीबीआयचे पथक प्रयत्नशील आहे.
CBI Raid Nashik Army CAT Major Engineer Trap
Bribe Corruption