इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक ही पोस्टामध्ये समजली जाते. त्यामुळे कोट्यवधी ग्राहक अत्यंत विश्वासाने पोस्टात गुंतवणूक करतात. मात्र, हैदराबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादनजीकच्या कोडंगुल येथे चक्क पोस्ट मास्तरनेच ग्राहकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून थेट २ कोटी ४५ लाख रुपये एवढी आहे. अखेर याची दखल थेट केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने घेतली आहे.
पोस्टात जे व्यवहार रोखीने होतात त्या व्यवहारांची संगणक प्रणालीवर बनावट नोंद करुन आणि प्रत्यक्षात ते पैसे सरकारी तिजोरीत न भरता वैयक्तिक वापरासाठी वापरणाऱ्या उप पोस्टमास्तरविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे. २०२० ते २०२२ अशा दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ४५ लाख रुपयांची अफरातफर या उप-पोस्टमास्तरने केल्याचे उघडकीस आले आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कोडंगुल पोस्ट ऑफिसमधे उप-पोस्टमास्तर पदावर कार्यरत असलेल्या के. लक्ष्मीनाथ या व्यक्तीने पोस्टात होणाऱ्या विविध रोखीच्या व्यवहारांमधे मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर केली आहे. त्यात मुख्य पोस्टाच्या अखत्यारित येणाऱ्या स्थानिक पोस्टात नागरिकांच्या विविध खाते व्यवहारांसाठी जी रक्कम रोखीने पाठविली जाते, त्यावरच डल्ला मारल्याचे निदर्शनास आले आहे. या अधिकाऱ्याने पोस्टासाठी विकसित केलेल्या सॅप प्रणालीमधे पैसे पाठविल्याची नोंद केली होती. मात्र, प्रत्यक्षात ते पैसेच पाठविले नव्हते. याकरिता स्थानिक पोस्टातील एका कर्मचाऱ्याला विश्वासात घेत तेथे देखील बनावट नोंदणी केली होती.
या प्रकरणाची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे. काम करत असलेल्या ठिकाणीच पोस्टमास्तरने पैशांची अशा प्रकारे अफरातफरी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सुरक्षितता आणखी वाढवण्यावर भर दिला जात आहे.
CBI Action Post Master 2 Crore Fraud FIR Crime Hyderabad